परीक्षा परिषदेच्या लाचखोर माजी आयुक्त शैलजा दराडे यांना जामीन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 09:38 AM2023-11-29T09:38:41+5:302023-11-29T09:40:01+5:30
पुराव्यात छेडछाड करू नये तसेच साक्षीदारांवर दबाव आणू नये यासह विविध अटीशर्तींसह ७५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर हा जामीन दिला आहे....
पुणे :शिक्षण विभागात नोकरी लावण्याच्या आमिषाने ४४ जणांची तब्बल ५ कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त शैलजा रामचंद्र दराडे यांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. गुल्हाणे यांनी जामीन मंजूर केला आहे. पुराव्यात छेडछाड करू नये तसेच साक्षीदारांवर दबाव आणू नये यासह विविध अटीशर्तींसह ७५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर हा जामीन दिला आहे.
नोकरीच्या आमिषाने फसवणूक केल्याप्रकरणी फेब्रुवारी महिन्यात शैलजा रामचंद्र दराडे (रा. पाषाण) यांच्यासह त्यांचा भाऊ दादासाहेब रामचंद्र दराडे (रा. इंदापूर) यांच्याविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोपट सुखदेव सूर्यवंशी (रा. खाणजोडवाडी, आटपाडी, सांगली) यांनी फिर्याद दिली होती. त्यानंतर ७ ऑगस्ट रोजी पोलिसांनी शैलजा दराडे यांना अटक केली होती. दराडे यांना न्यायालयाने पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर दराडे यांनी या प्रकरणात जामीन मिळवण्यासाठी जिल्हा न्यायालयात त्यांच्या वकिलांमार्फत अर्ज दाखल केला होता.