कर्वे रस्त्यावर चक्राकार वाहतुकीने गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 12:13 AM2019-01-15T00:13:04+5:302019-01-15T00:13:28+5:30
मेट्रोच्या कामासाठी निर्णय : एसएनडीटी चौक बंद, महामेट्रोकडून वॉर्डनची नेमणूक
पुणे : उड्डाणपुलाच्या कामासाठी कर्वे रस्त्यावर सोमवारपासून (दि. १४) पुन्हा चक्राकार वाहतूक सुरू करण्यात आली. त्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलापासून एसएनडीटी विद्यापीठापर्यंत रस्ता दुभाजक टाकून एक बाजूचा रस्ता बंद करण्यात आला. याबाबत पुरेशी कल्पना न दिल्याने वाहनचालकांचा पुरता गोंधळ उडाला. तसेच कर्वे रस्त्यासह विधी महाविद्यालय रस्ता व लगतच्या रस्त्यांवरही वाहतूककोंडी झाली.
कर्वे रस्त्यावर अभिनव चौकामध्ये मेट्रो व उड्डाणपुलाच्या कामाला काही दिवसांपासून सुरुवात करण्यात आली आहे. या कामासाठी पौड रस्त्याने नळस्टॉपकडे येणाऱ्या वाहतुकीत बदल करण्याचे आधीपासूनच प्रस्तावित होते. त्यानुसार काही वेळा वाहतुकीत बदलाचे प्रयोगही करण्यात आले. एसएनडीटी ते अभिनव चौकापर्यंतचा मार्ग वाहतुकीसाठी बंद करून ही वाहतूक कालवा रस्त्याने आठवले चौकातून अभिनव चौकाकडे वळविण्यात आली. पण यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी झाली. त्यामुळे हा प्रयोग लगेच थांबविण्यात आला. त्यानंतर महामेट्रोने कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगला वाहतुकीचा अभ्यास करून पर्याय सुचविण्यास सांगितले होते. त्यानुसार दोन पर्यायी मार्ग सुचविण्यात आले. दुचाकी, रिक्षा आणि कार व अन्य हलकी वाहने पौड रस्ता-एसएनडीटी-आठवले चौकाच्या दिशेने वळविणे व बस, ट्रक ही जड वाहने सरळ सोडणे हा एक पर्याय देण्यात आला.
या पर्यायाची अंमलबजावणी सोमवारी (दि.१४) दुपारनंतर सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी पौड रस्ता संपल्यानंतर काही अंतरापासून सिमेंटचे ब्लॉक टाकून रस्ता दुभाजक तयार करण्यात आला आहे.
हा दुभाजक एसएनडीटी विद्यापीठापर्यंत टाकण्यात आला आहे. दुभाजकामुळे रस्त्याचे दोन भाग झाले असून उजव्या बाजूने जड वाहने तर डाव्या बाजूने हलकी वाहने जावीत, असे फलक ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत.
४रस्ता दुभाजकाने एक लेन अभिवन चौकात जाण्यासाठी बंद करण्यात आल्याची माहिती वाहनचालकांना दिली जात नव्हती. त्यामुळे पौड रस्ता तसेच कर्वे रस्त्याने येणारी अनेक वाहने दोन्ही लेनने पुढे जात होती. परिणामी ज्या वाहनचालकांना सरळ नळस्टॉपकडे जायचे होते, ती वाहनेही बंद केलेल्या लेनमध्ये गेली.
ज्यांना विधी महाविद्यालय रस्त्याकडे जायचे होते, त्या चालकांना दुसºया लेनने सरळ नळस्टॉपकडे जावे लागले. त्यामुळे अनेकांना लांबचा वळसा घालावा लागला. या गोंधळामुळे अनेक वाहनचालकांनी नाराजी व्यक्त केली. काही बसचालकांनी वळसा टाळण्यासाठी वॉर्डनला विनंतीही केली. पण बॅरिकेड हटविण्यात
आलेले नाहीत.
चक्राकार वाहतुकीत गोंधळाची भर पडल्याने विधी महाविद्यालय रस्त्यावर वाहतूककोंडी झाली. रस्त्यावर काही काळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. कालवा रस्त्यावरही चालकांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागला. कर्वे रस्त्यावर रस्ता दुभाजकाबाबत गोंधळाची स्थिती झाल्याने तिथेही कोंडी झाली होती.