दुबईवरुन आलेल्या विमानातून 53 लाखांची साेन्याची बिस्किटे हस्तगत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2019 08:41 PM2019-06-17T20:41:14+5:302019-06-17T20:44:00+5:30
पुण्याच्या विमानतळावर दुबईच्या विमानातून 14 साेन्याची बिस्किटे हस्तगत
पुणे : दुबईवरुन पुण्याला आलेल्या स्पाईस जेट विमानाच्या टाॅयलेटमधून कस्टम विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने साेन्याची 14 बिस्किटे हस्तगत केली आहेत. त्यांची किंमत साधारण 53 लाख रुपये इतकी आहे.
रविवारी पहाटे 4.30 वाजता स्पाईसजेट एअरवेजचे दुबईवरुन आलेले एस जी - 52 हे विमान पुणे विमानतळावर उतरले. विमानाची साफसफाई करण्यात येत हाेती त्यावेळी विमानाच्या मागील भागात असणाऱ्या टाॅयेलटमधील बेसीनच्या एका फटीत ही 14 बिस्किटे एका प्लॅस्टिकच्या आवरणामध्ये लपवून ठेवण्यात आली हाेती. या बिस्किटांवर परदेशी बनावटीचे शिक्के असल्याचे आढळून आले. पर्यवेक्षक सुधांशु खैरे आणि निरिक्षक जयकुमार रामचंद्रन यांच्या निदर्शनास ही बिस्कीटे आली. ही बिस्किटे तस्करीसाठी आणली असल्याच्या संशयावरुन कस्टमच्या अधिकाऱ्यांनी ती हस्तगत केली.
ही कारवाई पुण्याच्या कस्टम विभागाचे उपायुक्त महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षक माधव पालीनिटकर, विनीता पुसदेकर, निरीक्षक बाळासाहेब हगवणे, घनश्याम जाेशी, आश्विनी देशमुख, हवालदार संदीप भंडारी, ए. एस. पवळे यांनी केली. याप्रकरणी पुढील कारवाई करण्यात येत आहे.