भाव विचारून भाजी न घेणे ग्राहकाला पडले महागात; भाजी विक्रेत्याकडून ग्राहकाला दांडक्याने बेदम मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 04:20 PM2022-05-13T16:20:44+5:302022-05-13T16:21:42+5:30
भाजी विक्रेत्याच्या ग्राहकाच्या तळहातावर चाकूने वार...
पुणे : एका भाजीवाल्याला भाव विचारायचे आणि दुस-याकडून भाजी विकत घ्यायची ही सवय ग्राहकाला चांगलीच महागात पडली. भाजी विक्रेत्याने ग्राहकाला दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना बी. टी. कवडे रस्त्यावर
घडली. भाजी विक्रेत्याने ग्राहकाच्या तळहातावर चाकूने वार केला.
या प्रकरणी भाजी विक्रेत्यावर वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, मात्र आरोपी पसार झाल्याने त्याचा शोध घेण्यात येत आहे. दिनेश जयेंद्र प्रसाद (वय ३४, सध्या रा. उदय बाग, बी. टी. कवडे रस्ता, घोरपडी) याने या संदर्भात वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
या प्रकरणी अब्दुल नावाच्या एका भाजी विक्रेत्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उदय बाग परिसरातील पदपथावर अब्दुल नावाचा भाजी विक्रेता आहे. प्रसाद त्याच्याकडे भाजी खरेदीसाठी गेला. त्याने भाजीचे
भाव विचारले. भाव जास्त वाटल्याने त्याने शेजारी असलेल्या भाजी विक्रेत्याकडे चौकशी केली आणि त्याच्याकडून भाजी खरेदी केली. भाव विचारुन दुस-या भाजी विक्रेत्याकडून भाजी खरेदी केल्याने अब्दुल चिडला. त्याने प्रसादला दांडक्याने मारहाण केली. अब्दुलने प्रसादच्या तळहातावर चाकुने वार केले. मारहाणीत प्रसाद जखमी झाला. त्याने पोलिसांकडे तक्रार दिली.