चलन नसल्याने ग्राहक परतले घरी
By admin | Published: January 11, 2017 02:10 AM2017-01-11T02:10:47+5:302017-01-11T02:10:47+5:30
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या डेहणे शाखेत चलनपुरवठ्याअभावी खातेदार, शेतकऱ्यांना पैसे न घेताच परतावे लागत आहे.
डेहणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या डेहणे शाखेत चलनपुरवठ्याअभावी खातेदार, शेतकऱ्यांना पैसे न घेताच परतावे लागत आहे.
रिझर्व्ह बँकेने जिल्हा मध्यवर्ती बँकेला आता व्यवहार करण्यास परवानगी दिली; परंतु बँकेकडील जमा झालेल्या जुन्या नोटा अजूनही बदलून दिल्याच नाहीत. पर्यायाने बँॅक ग्राहकांना रक्कम देण्यास असमर्थ ठरली आहे.
या सर्व गोंधळात स्वत:चे पैसे असूनही ते मिळत नसल्याने शेतकरी, कामगार, कर्मचारी, व्यापारी व महिला हतबल झाले आहेत. शहरातील व्यवहार कॅशलेसमुळे निदान बरे आहेत; पण ग्रामीण भागातील जनतेला मात्र दररोज अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. गेले ६० दिवस गोरगरीब कसाबसा प्रापंचिक खर्च भागवत आहेत. आता उधारीवर ही कोणी माल देत नाही, रोख पैसे
तर दूरच.
६० दिवसांनंतरही ना पैसे मिळतात, ना रांगा संपल्या. शाळेचा खर्च, घरखर्च, बी-बियाणे, दूध, दवाखाना अशा दैनंदिन गरजा पूर्ण करताना ग्रामीण जनता मेटाकुटीला आली आहे.
शेतमालाचे भाव पडल्याने यंदाचा संपूर्ण हंगाम वाया गेला आहे. शेतातील उत्पन्न तर सोडाच; पण बी-बियाणे व खताचा खर्चही निघाला नाही. (वार्ताहर)