कस्टमने पकडले एक कोटीचे ड्रोन
By admin | Published: October 1, 2016 03:44 AM2016-10-01T03:44:22+5:302016-10-01T03:44:22+5:30
विदेशामधून आणलेले तब्बल एक कोटी रुपयांचे ७ ड्रोन सीमाशुल्क विभागाने (कस्टम) लोहगाव विमानतळावर पकडले असून, ते घेऊन आलेल्या व्यक्तीला पकडण्यात आले आहे.
पुणे : विदेशामधून आणलेले तब्बल एक कोटी रुपयांचे ७ ड्रोन सीमाशुल्क विभागाने (कस्टम) लोहगाव विमानतळावर पकडले असून, ते घेऊन आलेल्या व्यक्तीला पकडण्यात आले आहे.
वेबनॉईज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे कर्मचारी अमित तटके यांच्याविरुद्ध सीमाशुल्क कायदा १९६२ आणि दूरसंचार अधिनियमन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीमाशुल्क विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, तटके यांनी कॅनडामधून येताना प्रिसीजन हॅक या कंपनीने तयार केलेले ७ ड्रोन सोबत आणले होते. लोहगाव विमानतळावर त्यांच्या साहित्याच्या तपासणीदरम्यान बॅगेत ७ ड्रोन आढळून आले. या ड्रोनची विक्री हाईट्स नेक्स्ट कंपनीचे मालक विकास कुमार यांना केली जाणार होती, असे तटके याने सीमाशुल्क विभागाला सांगितले आहे. कस्टम्सकडून वेबनॉईज आणि हाईट्स नेक्स्ट या कंपन्यांमधील व्यवहारांची चौकशी केली जाणार असल्याचे पुणे विभागाचे उपायुक्त के. शुभेंदू यांनी सांगितले. (प्रतिनिधी)