सीमा शुल्क आयुक्तालयाने १ कोटीचे अमली पदार्थ केले नष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2019 01:51 AM2019-04-01T01:51:05+5:302019-04-01T01:52:11+5:30
अमली पदार्थविरोधी सत्र न्यायालयाच्या पूर्वपरवानगीने ही कारवाई करण्यात आली़
पुणे : वेगवेगळ्या १० गुन्ह्यांमध्ये जप्त केलेले १ कोटी २ लाख ४४ हजार रुपयांचे अमली पदार्थ सीमा शुल्क आयुक्तालयाने न्यायालयाच्या परवानगीने शनिवारी नष्ट केले़ रांजणगाव एमआयडीसीतील महाराष्ट्र एनव्हिरो पॉवर कंपनीच्या फॅक्टरीमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली हे अमली पदार्थ नष्ट करण्यात आले़
अमली पदार्थविरोधी सत्र न्यायालयाच्या पूर्वपरवानगीने ही कारवाई करण्यात आली़ त्यात १ हजार ३४४ किलो गांजा, ३ गॅ्रम कोकेन, ८९० इतर माल असा १ कोटी २ लाख ४४ हजार ५०० रुपयांचा माल फॅक्टरीमध्ये ड्रग्ज डिस्पोजल कमिटी आणि शासकीय एजन्सींच्या साक्षीदारांच्या देखरेखीखाली हा माल नष्ट करण्यात आला़ पुणे सीमा शुल्क आयुक्तालयाची हद्द पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे़ या १० गुन्ह्यांमध्ये १२ जणांना अटक करण्यात आली असून, त्यात एका परदेशी नागरिकाचा समावेश आहे़ या वेळी सीमा शुल्क आयुक्तालयाचे सहआयुक्त सोहल काझी, अतिरिक्त आयुक्त दिलीप गोयल, सहायक आयुक्त टी़ कृष्णमूर्ती, सुपरीटेंड अलेक्झेंडर ली, अनिल शिंदे, उपअधीक्षक महेश पाटील, निरीक्षक मुकेश कुमार, नेगी आणि शिपाई पवार उपस्थित होते़