Pune Police: हरियाणा आणि दिल्लीतील तब्बल २२ गुन्ह्यात वाँटेड असणाऱ्या कस्टम अधिकाऱ्याला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 09:36 PM2022-01-24T21:36:45+5:302022-01-24T21:36:52+5:30
हरियाणा पोलिसांनी ४५ लाखाचे सोने चोरल्याप्रकरणी त्याला अटक केली होती. पोलिसांना संमोहित करुन तो पळून गेला होता
पुणे : हरियाणा आणि दिल्लीमधील तब्बल २२ गुन्ह्यात वाँटेड असलेल्या व शिवाजीनगर परिसरात वेशांतर करुन राहणाऱ्या तोतया कस्टम अधिकाऱ्याला शिवाजीनगर पोलिसांनीअटक केली आहे. जाफर अलिखान ईराणी (वय ३०, रा. इराणी वस्ती, शिवाजीनगर) असे त्याचे नाव आहे.
हरियाणा पोलिसांनी ४५ लाखाचे सोने चोरल्याप्रकरणी त्याला अटक केली होती. पोलिसांना संमोहित करुन तो पळून गेला होता. त्यामुळे ७ पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. यामुळे हरियाणा पोलीसही त्याच्या मागावर होते. शिवाजीनगर पोलीस रविवारी पेट्रोलिंग करत असताना शिवाजीनगर रेल्वे स्टेशनजवळील विष्णूकृपानगर या इराणी वस्तीमध्ये एक जण त्यांना पाहून पळून जाऊ लागला होता. त्याला पाठलाग करुन त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने जाफर इराणी असे नाव सांगितले. त्याची अधिक चौकशी केली असता त्याला नुकतेच कोंढवा पोलिसांनी अटक केले होते. या गुन्हयात तो जामिनावर बाहेर आलेला असल्याचे समजले. तसेच तो श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यात पाहिजे असलेबाबत माहिती प्राप्त झाली.
त्याच्याविषयी अधिक चौकशी केली असता हरियाणा व दिल्ली येथे तो मोस्ट वॉन्टेड असून एकूण २२ गुन्ह्यांमध्ये पाहिजे असल्याबाबत माहिती मिळाली. त्यापैकी हरियानातील हिसार पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात त्याने कस्टम अधिकारी असल्याची बतावणी करुन एक किलो सोने ४५ लाख रुपयांची चोरी केली आहे. हिसार पोलिसांनी त्याला अटक केली होती. अटकेत असताना त्याच्या देखरेखीवर असलेल्या पोलिसांना संमोहित करुन तो पळून गेला होता.
जाफर इराणी याला श्रीगोंदा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई उपायुक्त प्रियांका नारनवरे, सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावंकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे, पोलीस निरीक्षक विक्रम गौड सहायक पोलीस निरीक्षक उत्तम माने, पोलीस उप निरीक्षक भैरवनाथ शेळके, विनोद महागडे, विजय पानकर, हवालादार बशीर सय्यद, पोलीस अंमलदार राहुल होळकर, अनिकेत भिंगारे, अविनाश पुंडे, ज्ञानेश माने, अमोल कोल्हे या पथकाने केली.
जाफर हा मुळचा पुण्यातील असून गेल्या वर्षी सप्टेबरमध्ये त्याने हरियाना, लुधियाना, दिल्ली येथे पोलीस अधिकारी, कस्टम अधिकारी असल्याची बतावणी करुन फसवणूक केली आहे.