महाविद्यालयांच्या प्रवेशाचे कटआॅफ यंदाही वाढणार

By admin | Published: June 1, 2017 02:48 AM2017-06-01T02:48:29+5:302017-06-01T02:48:29+5:30

बारावीचा आॅनलाइन निकाल मंगळवारी जाहीर झाला, निकालामध्ये मागील वर्षीच्या तुलनेत ३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचबरोबर

Cut-off for college admissions will be increased this year | महाविद्यालयांच्या प्रवेशाचे कटआॅफ यंदाही वाढणार

महाविद्यालयांच्या प्रवेशाचे कटआॅफ यंदाही वाढणार

Next

पुणे : बारावीचा आॅनलाइन निकाल मंगळवारी जाहीर झाला, निकालामध्ये मागील वर्षीच्या तुलनेत ३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचबरोबर विज्ञान शाखेतून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे शहरातील प्रमुख महाविद्यालयांच्या प्रवेशाचे कटआॅफ यंदा वाढणार आहेत. विज्ञान शाखेमधून सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, त्यामुळे या शाखेसाठी सर्वाधिक चुरस असणार आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांची वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेशाच्या चौकशीसाठी विद्यार्थ्यांची लगबग सुरू झाली आहे. अनेक विद्यार्थ्यांनी बुधवारी महाविद्यालयांमध्ये जाऊन प्रवेश प्रक्रियेची चौकशी केली. त्याचबरोबर महाविद्यालयांच्या संकेतस्थळावरून प्रवेशाची माहिती घेण्यात आली. प्रमुख महाविद्यालयांमध्ये आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना मंगळवारी त्यांना पडलेल्या गुणांची टक्केवारी आॅनलाइन समजली असली तरी प्रत्यक्ष गुणपत्रिका ९ जून रोजी गुणपत्रिका मिळणार आहेत. दरम्यानच्या काळात त्यांना प्रवेश हव्या असलेल्या महाविद्यालयांचे आॅनलाइन अर्ज भरून ठेवता येणार आहेत.
पुणे जिल्हयातून ९०.५९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विज्ञान शाखेमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. विज्ञान शाखेतून सर्वाधिक ५ लाख १६ हजार ११७ विद्यार्थी (९५.८५ टक्के) उत्तीर्ण झाले. त्यापाठोपाठ वाणिज्य शाखेतून ३ लाख २३ हजार ४१५ विद्यार्थी (९०.५७ टक्के) उत्तीर्ण झाले. कला शाखेतून ३ लाख ८९ हजार ८० विद्यार्थी (८१.९१ टक्के) उत्तीर्ण झाले. विज्ञान शाखेबरोबरच कला आणि वाणिज्य शाखेच्या कटआॅफमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे.
बारावी परीक्षेमध्ये ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ३ हजार ८१९ इतकी आहे. सर्व विद्यार्थ्यांमधून ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १ लाख १० हजार ७८४ इतकी आहे. मुंबई विभागातून ३ लाख १७ हजार ६१५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी ३६ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविले आहेत. पुणे विभागातून २ लाख ३० हजार ८७१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी १७ हजार ४२७ विद्यार्थ्यांनी ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविले.

तुकड्या वाढण्याची शक्यता कमीच
बारावीच्या निकालामध्ये ३ टक्क्यांनी वाढ झाली असली तरी महाविद्यालयांच्या तुकड्या वाढण्याची शक्यता कमी आहे. कारण तुकड्या वाढविण्यासाठी यापूर्वीच विद्यापीठांकडे प्रस्ताव सादर करावे लागतात. आता तुकड्या वाढविण्याची प्रक्रिया सुरू करणे अवघड ठरणार आहे. त्यामुळे उपलब्ध जागेमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी मोठी चुरस असणार आहे.

Web Title: Cut-off for college admissions will be increased this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.