दिवाळीच्या मुहूर्तावर खाद्यतेलाच्या दरात घट; गृहिणींना दिलासा
By अजित घस्ते | Published: November 5, 2023 06:39 PM2023-11-05T18:39:34+5:302023-11-05T18:39:54+5:30
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खाद्यतेलाला मागणी कमी झाल्याने गेल्या काही महिन्यांपासून खाद्यतेलाच्या दरात टप्प्याटप्प्याने घट झाली
पुणे : गेल्या वर्षी दिवाळीत खाद्यतेलांचे दर तेजीत होते. मात्र यंदा गेल्या दिवाळीच्या तुलनेत सूर्यफूल, पाम, सोयाबीन, सरकी तेलाच्या दरात ३० ते ३५ टक्क्यांनी घट झाली आहे. दिवाळीत मोठ्या प्रमाणात तळलेले पदार्थ बनवत असतात. मात्र यंदा खाद्यतेलाच्या दरात घट झाल्याने दिवाळीत गृहिणींना दिलासा मिळाला आहे. किरकोळ बाजारात एक किलो सोयाबीन, सूर्यफूल, पाम, सरकी तेलाचे दर ९० ते १०० रुपयांदरम्यान आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खाद्यतेलाला मागणी कमी झाल्याने गेल्या काही महिन्यांपासून खाद्यतेलाच्या दरात टप्प्याटप्प्याने घट झाली.
रशिया- युक्रेनमधून सूर्यफूल तेलाची आवक होते. गेल्या वर्षी खाद्यतेलांच्या दरात मोठी वाढ झाली होती. त्या वेळी केंद्र शासनाने देशातील प्रमुख तेल आयातदारांना २० लाख टन तेलाच्या आयातीवर आयातशुल्क माफ केले होते. आयातशुल्क माफ केल्याने तेलदरात घट झाली तसेच जागतिक बाजारपेठेतून खाद्यतेलाचा पुरवठा सुरळीत झाल्यानंतर गेल्या वर्षभरापासून खाद्यतेलाच्या दरात टप्प्याटप्प्याने घट झाली, असे व्यापारी सांगत आहे.
शेंगदाणा तेलाचे दर टिकून : सूर्यफूल, सोयाबीन, करडई इतर तेलाच्या दृष्टीने शेंगदाणे तेलाचे दर टिकून आहेत. सद्या 220 ते 270 दर आहे.
तेलाचे दर
खाद्यतेलांचे १५ किलोचे दर (कंसात गेल्या वर्षी दिवाळीतील दर)
पाम- १३५० ते १५०० रुपये (२१०० ते २१५० रुपये)
सूर्यफूल - १४०० ते १५०० रुपये (२३०० ते २४०० रुपये)
सोयाबीन- १४०० ते १५०० रुपये (२३०० ते २४०० रुपये)
सरकी - १४०० ते १५५० रुपये ( २२०० रुपये)
वनस्पती तूप- १४०० ते १६०० रुपये (१९०० ते २००० रुपये)
शेंगदाणा- २७०० ते २८०० रुपये (२८०० ते २९०० रुपये )
केंद्र शासनाने देशातील प्रमुख तेलआयातदारांना २० लाख टन तेलाच्या आयातीवर आयातशुल्क माफ केले होते. आयातशुल्क माफ केल्याने तेलदरात घट झाली तसेच जागतिक बाजारपेठेतून खाद्यतेलाचा पुरवठा सुरळीत झाल्यानंतर गेल्या वर्षभरापासून खाद्यतेलाच्या दरात टप्प्याटप्प्याने घट झाली.ऐन दिवाळीत तेल स्वस्त झाल्याने महिला गृहिणी ना दिलासा मिळत आहे. - कन्हैयालाल गुजराती, खाद्यतेल व्यापारी, मार्केट यार्ड