व्हॉट्सॲप कॉलिंगवरून उघड झाला कट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:10 AM2021-07-20T04:10:05+5:302021-07-20T04:10:05+5:30
व्हीके व व्हीके न्यू नावाने सेव्ह असलेले दोन्ही मोबाईल क्रमांक कॅम्प परिसरातील भाजपचे माजी नगरसेवक व पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे ...
व्हीके व व्हीके न्यू नावाने सेव्ह असलेले दोन्ही मोबाईल क्रमांक कॅम्प परिसरातील भाजपचे माजी नगरसेवक व पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे तत्कालीन उपाध्यक्ष विवेक यादव यांचे असल्याचे राजन याने सांगितले. राजन येरवडा कारागृहात वानवडी पोलीस ठाण्यातील खुनाच्या गुन्ह्यात २०१५ पासून आजन्म कारावासाची शिक्षा भोगत होता. मे २०२० मध्ये कोविड रजेवर बाहेर आला आहे. सुमारे ३ महिन्यांपूर्वी विवेक यादव याने राजन याला घरी बोलावले. यादव राजन याला म्हणाला की, बबलू गवळी याचा खून करायचा, पोलीस स्टेशन, कोर्ट, जेल सर्व मी बघेन. तुला अपिल व जामीनासाठी मदत करतो. तसेच तुझ्या घरच्यांनाही पैसेदेखील देतो. त्यामुळे मी बबलू गवळीच्या खुनाची सुपारी घेण्यास तयार झालो, असे राजन याने पोलिसांना चौकशीदरम्यान सांगितले.
२१ जून रोजी विवेक यादव याने राजन याला मुंबई येथे भेटण्यासाठी बोलावले. सायंकाळी यादव याने त्याच्या एका वकिलाची भेट घडवून दिली. त्यानंतर यादव याच्या कारमध्ये बसून बबलू गवळी याला मारण्याचा प्लॅन रचला. त्यासाठी यादव हा राजन याला ५ पिस्तूले व ठरलेले पैसे देण्याचे कबूल केले. गवळीला कॅम्प परिसरात मारण्याचे दोघांच्या भेटीत ठरल्याचे राजन याने पोलिसांना सांगितले. कोणालाही प्लॅनचा सुगावा लागू नये म्हणून राजन व यादव हे दोघे केवळ व्हॉट्सअॅप कॉलवर बोलत असत. संभाषणाचे चॅटिंगदेखील डिलीट करण्याचे ठरले होते. त्यानंतर राजन याने त्याचा जेलमधील मित्र इब्राहिम याला गवळीच्या खुनाची माहिती देऊन त्याला सामील करून घेतले.
............
यादवच्या माणसाने पुरवली हत्यारे व पैसा
३० जून रोजी विवेक यादव याने राजन याला व्हॉट्सअॅप कॉल करून पैसे व हत्यारे पोहच करतो असे सांगितले. त्यानुसार १ जुलै रोजी एकाने राजन याला ३ पिस्तूले, ७ राउंड व २ लाखाची रोकड रामटेकडी ब्रिजजवळ पोहच केली होती. परंतु, राजन व इब्राहिम हे गवळीचा गेम वाजविण्यापूर्वीच पोलिसांना याची माहिती मिळाली व त्यांचाच गेम झाला.
----------------------------------