एकदा फसवणूक झाल्यावर पण आयटी इंजिनिअरने पुन्हा दिला चोरट्याला अकाउंट नंबर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 08:10 PM2020-01-15T20:10:35+5:302020-01-15T20:12:11+5:30

एका खात्यातून पैसे काढले गेल्यावरही दिला दुसऱ्या खात्याचा क्रमांक

cyber criminal fruad with IT engineer | एकदा फसवणूक झाल्यावर पण आयटी इंजिनिअरने पुन्हा दिला चोरट्याला अकाउंट नंबर

एकदा फसवणूक झाल्यावर पण आयटी इंजिनिअरने पुन्हा दिला चोरट्याला अकाउंट नंबर

Next
ठळक मुद्देघोरपडी गावातील ४५ वर्षांच्या एका व्यक्तीने मुंढवा पोलीस ठाण्यात दिली फिर्याद

पुणे : ते पुण्यातील हिंजवडी येथील एका आय. टी. कंपनीत लिड कन्सलटंट म्हणून काम करतात. त्यांची दोन वेगवेगळ्या बँकेत खाती असताना त्यांना तिसरे बचत खाते सुरु करायचे होते. त्यासाठी त्यांनी ऑनलाईन चौकशी केली. जवळच्या बँकेच्या कस्टमर केअरशी संपर्क साधला. त्याने सध्याच्या बँक खात्याची माहिती विचारल्यावर त्यांनी माहिती दिली. काही मिनिटांतच त्यांच्या खात्यातून १ लाख रुपये काढले गेले़ तरीही त्यांनी दुसºयांदा फोनवरील व्यक्तीवर विश्वास ठेवून आपल्या दुसऱ्या बँक खात्याचीही माहिती दिली. त्या खात्यातूनही ७५ हजार रुपयांना गंडा घातला गेला. उच्च शिक्षित आणि आय. टी. क्षेत्रात काम करणाऱ्यांनाही सायबर चोरटे बेमालुमपणे गंडा घालत असल्याचे दिसून आले आहे. त्यांचे पैसे गोरेगाव येथील संजीव कुमार याच्या कोटक महिद्रा बँक खात्यात पैसे जमा झाले असून, सायबर पोलिसांनी हे खाते गोठविले आहे.
या प्रकरणी घोरपडी गावातील ४५ वर्षांच्या एका व्यक्तीने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या बाबत पोलिसांनी सांगितल्यानुसार, फिर्यादी यांना घराजवळ तिसरे नवीन बँक खाते सुरु करायचे होते. त्यांनी ८ एप्रिल २०१९ रोजी इंटरनेटवरुन सर्च केला. तेव्हा बँक ऑफ बडोदाची शाखा व मोबाईल नंबर मिळाला. त्या क्रमांकावर संपर्क साधला असता त्यांना दीपक अग्रवाल नावाच्या व्यक्तीने स्वत:ला बँकेचा प्रतिनिधी असल्याचे सांगून इतर बँकेत खाते आहे का याची चौकशी केली. मुंढवा शाखेत खाते सुरु करण्यासाठी युपीआय अ‍ॅप अ‍ॅक्टीव्हेट करावे लागेल, असे सांगून तुम्हाला पाठविलेला एसएमएस दिलेल्या मोबाईल नंबरवर पाठवा असे सांगितले.
त्याप्रमाणे त्यांनी केल्यावर त्यांना युपीआय अ‍ॅक्टीव्हेट करण्यासाठी त्यांच्या डेबिट कार्डचा नंबर घेतला. त्यानंतर थोड्याच वेळात त्यांना चार एसएमएस आले. त्यात त्यांच्या खात्यातून प्रत्येकी २५ हजार रुपये असे १ लाख रुपये काढून घेतल्याचे आढळून आले. त्यांना शंका आल्याने त्यांनी सिटी बँकेचे खाते गोठविण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी दीपक अग्रवाल असे नाव सांगितलेल्या व्यक्तीला पुन्हा फोन करुन खात्यावरुन पैसे कसे ट्रान्सफर झाले, अशी विचारणा केली. त्यावर त्याने चुकून झाले असे सांगितले व पैसे परत पाठविण्यासाठी तुमचे दुसऱ्या बँकेत खाते आहे का व त्याला मोबाईल नंबर लिंक आहे का यांची चौकशी केली. एकदा फसवणूक झाली असतानाही त्यांनी आपला दुसऱ्या बँक खात्याचा क्रमांकही त्याला दिला. त्यानंतर वानवडी येथील एचडीएफसी बँक खात्यातून काही वेळात ३ एसएमएस आले. त्याद्वारे प्रत्येकी २५ हजार रुपये असे ७५ हजार रुपये काढून घेण्यात आल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांनी हे बँक खातेही गोठविले. सायबर पोलिसांनी अधिक तपासासाठी हा गुन्हा मुंढवा पोलिसांकडे वर्ग केला.

........

सायबर पोलिसांकडे तक्रार आल्यानंतर त्यांनी तातडीने त्याचा तपास केला. हे पैसे ज्या खात्यात ट्रान्सफर झाले होते़ ते महिंद्र कोटक बँकेतील खाते गोठविले. हे खाते गोरेगाव येथील संजीव कुमार याच्या नावावर असल्याची माहिती मिळाली आहे. गोठविलेले पैसे अद्याप फिर्यादीला मिळाले नसून मुंढवा पोलीस अधिक तपास करत आहेत.

Web Title: cyber criminal fruad with IT engineer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.