एटीएम मशिनमध्ये स्किमर लावून अनेकांचे पैसे हडपणाऱ्या आरोपींना सायबर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2020 01:46 PM2020-10-05T13:46:38+5:302020-10-05T13:48:23+5:30
पोलिसांनी केला आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर; १ वर्षांपासून पोलीस आरोपींच्या मागावर..
पुणे ( धायरी) : सिंहगड रस्ता परिसरातील सनसिटी भागातील क्राऊन बेकरी समोर असलेल्या आयसीआयसीआय एटीएम मशिनमध्ये स्किमर लावून अनेक नागरिकांचे लाखो रुपये हडप करणाऱ्या तीन चोरट्यांना सायबर पोलिसांनी अटक केली. विश्वजित डुबेर छत्री (वय: ३३, दांडा खार, मुंबई) प्रकाश शिनप्पा शेट्टी (वय: ४६, दहिसर, मुंबई) फैजी अल्ताफ रझा (वय : ४३, टिळक कॉलनी, अंबरनाथ, ठाणे ) अशी आरोपींची नावे आहेत. याबाबत आरोपींना न्यायालयात हजर केले असता सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी स्वाती मांढरे (वय :३९, आनंदनगर, सिंहगड रस्ता , पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी स्वाती मांढरे यांनी २६ सप्टेंबरला सनसिटी भागात असलेल्या आयसीआयसीआय एटीएम मशिनमधून १० हजार रुपये काढले होते. त्यानंतर ३० सप्टेंबरला फिर्यादी घरी असताना दुपारी एकच्या दरम्यान त्यांना ४० हजार रुपये बँक खात्यातून कमी झाल्याचा मोबाईलवर मेसेज आला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या एटीएम मशिनमध्ये व्यवहार करणाऱ्या बऱ्याच नागरिकांना अशाप्रकारे गंडा घातल्याची तक्रारी ह्यापूर्वी आल्या होत्या. सायबर पोलिसांनी तपास करून तीनही आरोपींना बालेवाडी परिसरातून ताब्यात घेऊन अटक केली आहे. ही कारवाई सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किरण औटे, पोलीस नाईक दीपिका मोहिते,पोलीस शिपाई शिरीष गावडे, अनिल पुंडलिक, सोमनाथ भोरडे आदी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.पुढील तपास सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकिशोर शेळके करीत आहेत.
पोलिसांनी केला आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर; १ वर्षांपासून पोलीस आरोपींच्या मागावर..
अनेक वेळा नागरिकांच्या बँक खात्यातून लाखो रुपये गायब झाल्याच्या घटना सतत घडत आहेत. अशाच घटना सिंहगड रस्ता परिसरातही यापूर्वी घडल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर सायबर टीमने सिंहगड रस्ता परिसरातील सनसिटी रस्त्यावर असलेल्या एटीएम मशिनमधील व आजूबाजूच्या सीसीटीव्ही कॅमेराच्या तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आरोपींना पकडले.
पैसे काढण्यासाठी 'या' पद्धतीचा वापर .
अशा प्रकारच्या चोरीबाबत सायबर चोरटे जुन्या पद्धतीचे एटीएम मशिन ज्या भागात आहे. अशा भागात रेकी करतात. जेणेकरून ज्या एटीएमला सुरक्षा रक्षक नाहीत. अशा एटीएम मशिनला चोरट्यांकडून स्कीमर लावले जाते. नागरिकांच्या लक्षात येणार नाही अशा पद्धतीने चोरटे मशीनच्या की-पॅडवर पिनहोल सर्किट कॅमेरा लावत असे. तसेच एटीएम कार्ड ज्या ठिकाणी घातले जाते त्याठिकाणी स्किमर लावत असत. त्यानंतर दोन तासांनी परत येऊन झालेले रेकॉर्डिंग चोरटे घेऊन जात. त्यानंतर लॅपटॉप व कार्ड राईटच्या साहाय्याने त्यानुसार हुबेहूब डुप्लिकेट एटीएम कार्ड बनवून अन्य एटीएम मशीनमधून पैसे काढत असत.
....
- ग्राहकांनी जुन्या पद्धतीच्या तसेच संशयास्पद वाटणाऱ्या एटीएम मशिनमधून पैसे काढणे टाळावे, त्याचबरोबर अशापद्धतीने ज्यांची फसवणूक झाली आहे, त्यांनी ताबडतोब पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.किरण औटे, पोलीस उपनिरीक्षक , सायबर पोलीस ठाणे