पुण्यातील प्रसिद्ध ज्वेलर्सला सायबर चोरट्यांचा ३ कोटींचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2019 11:36 AM2019-12-05T11:36:31+5:302019-12-05T18:12:12+5:30
पु. ना. गाडगीळ अँड सन्स यांच्या महासिक्युअर अॅपमध्ये सायबर चोरट्याने लॉगइन करुन पासवर्ड बदलून १२ खात्यातून २ कोटी ९८ लाख ४० हजार रुपये लंपास केले.
पुणे : पुण्यातील एका प्रसिद्ध ज्वेलर्स कंपनीच्या महासिक्युअर अॅपमध्ये सायबर चोरट्याने लॉगइन करुन पासवर्ड बदलून त्यांच्या १२ बँक खात्यातून तब्बल २ कोटी ९८ लाख ४०० रुपयांवर दरोडा टाकून लंपास केले आहेत. ही घटना ११ ते १३ नोव्हेंबर दरम्यान घडली आहे.
याप्रकरणी आदित्य अमित मोडक (वय २८, रा. महात्मा सोसायटी, कोथरुड) यांनी सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सायबर चोरट्यांनी पु. ना. गाडगीळ यांच्या बँक खात्यातून २० बँक खात्यात ट्रान्सफर केली आहे. ज्वेलर्स कंपनीचे महासिक्युअर अॅप आहे. या अॅपच्या माध्यमातून सर्व बँक व्यवहार केले जातात. सायबर चोरट्यांनी सोमवारी ११ नोव्हेंबर रोजी दुकानाला सुट्टी असताना या महासिक्युअर अॅपचा पासवर्ड प्राप्त करुन त्यात लॉगइन केले. त्यानंतर त्याचा पासवर्ड बदलला. त्यानंतर या अॅपच्या सहाय्याने त्यात १९ खाती समाविष्ट केली. त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्राच्या एकूण १२ बँक खात्यातून त्यांनी १९ खाती व आणखी एक खाते अशा २० खात्यांवर तब्बल २ कोटी ९८ लाख ४०० रुपये ट्रान्सफर केले. त्यानंतर या खात्यातून हे पैसे वेगवेगळ्या ठिकाणाहून काढून घेण्यात आले आहे. हा प्रकार १३ नोव्हेंबरपर्यंत सुरु होता. याबाबत ज्वेलर्स यांच्या वतीने कंपनीचे मुख्य आर्थिक अधिकारी आदित्य मोडक यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला होता. सायबर पोलिसांनी केलेल्या चौकशीत १९ बँक खाती निष्पन्न झाली आहे. त्यांनी चौकशी केल्यानंतर आता सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.