पुण्यात सायबर चोरट्यांचा धुमाकूळ; तब्बल ७५ लाखांचा चुना लावला!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 06:57 PM2024-12-03T18:57:03+5:302024-12-03T18:57:23+5:30
शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळण्याचे आमिष चोरटयांनी दाखविले, तसेच ऑनलाईन टास्कच्या आमिषाने फसवणूक केली
पुणे: घरातून काम करण्यासाठी ऑनलाइन टास्कचे आमिष दाखवून चोरट्यांनी विश्रांतवाडी भागातील एका महिलेची ४२ लाख १२ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या घटनेसह शहरात आणखी दोन फसवणुकीच्या घटना उघडकीस आल्या असून, या वेगवेगळ्या घटनेत तक्रारदारांची ७५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.
कोथरूड भागातील एका तरुणाला शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने चोरट्यांनी २५ लाख एक हजार रुपयांचा ऑनलाइन गंडा घातला. याबाबत तरुणाने कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुणाच्या मोबाइल क्रमांकावर चोरट्यांनी संपर्क साधला. फिनवेस्ट कंपनीतून बोलत असल्याची बतावणी चोरट्यांनी केली. चोरट्यांनी तरुणाला शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविले. त्यानंतर चोरट्यांनी तरुणाला बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. तरुणाने चोरट्यांच्या खात्यात वेळोवेळी पैसे जमा केले. सुरुवातीला तरुणाला परताव्यापोटी काही रक्कम दिली. पैसे जमा केल्यानंतर चोरट्यांनी त्यांचे मोबाइल क्रमांक बंद केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विक्रमसिंह कदम तपास करत आहेत.
ऑनलाइन टास्कच्या आमिषाने बिबवेवाडी भागातील एकाची चोरट्यांनी सहा लाख ३७ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर साळुंखे तपास करत आहेत. कुरिअरद्वारे पाठविलेल्या पाकिटात अमली पदार्थ सापडल्याची बतावणी करून चोरट्यांनी बिबवेवाडी भागातील एका महिलेची तीन लाख पाच हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. चोरट्यांनी महिलेच्या माेबाइल क्रमांकावर संपर्क साधला. एका कुरिअर कंपनीतून बोलत असल्याची बतावणी करून चोरट्यांनी केली. पाकिटात अमली पदार्थ सापडल्याची भीती चोरट्यांनी दाखविली. याप्रकरणी पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगून चोरट्यांनी महिलेला बँक खात्यात पैसे भरण्यास सांगितले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली.