घोड धरणातुन शिरूर व श्रीगोंदा च्या पूर्व भागासाठी आवर्तन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:09 AM2021-04-12T04:09:24+5:302021-04-12T04:09:24+5:30
रांजणगाव सांडस : शिरसगाव काटा : शिरूर तालुक्यातील चिंचणी येथील घोड धरणातून 3 दरवाज्यांतून 2200 क्यूसेसने पाणी नदीपात्रात नुकतेच ...
रांजणगाव सांडस : शिरसगाव काटा : शिरूर तालुक्यातील चिंचणी येथील घोड धरणातून 3 दरवाज्यांतून 2200 क्यूसेसने पाणी नदीपात्रात नुकतेच सोडण्यात आल्याची माहिती शाखा अभियंता रवींद्र देशमुख व कनिष्ठ अभियंता किरण तळपे यांनी दिली. शिरूर तालुक्यातील चिंचणी, शिरसगाव काटा, पिंपळसुट्टी, तांदळी, इनामगाव, गणेगाव दुमाला तसेच श्रीगोंदा तालुक्यातील बोरी, वांगदरी, हंगेवाडी, चिंभळे, काष्टी अशा गावांना या पाण्याचा फायदा होतो. घोडधरणाखाली शिरसगाव काटा, धनगरवाडी, नलगेमळा, गांधलेमळा, खोरेवस्ती, संगम असे 6 बंधारे असून शिरूर व श्रीगोंदा तालुक्यातील 4 हजार हेक्टर लाभक्षेत्राला याचा फायदा होणार आहे. सहापैकी पाच बंधाऱ्यातील पाणीसाठा गेल्या आठ दिवसांपूर्वी पूर्णपणे आटला होता तर नलगेमळा येथील बंधाऱ्यात काही प्रमाणात पाणीसाठा शिल्लक होता. घोडनदी काठावरील गावांमध्ये गेल्या आठ दिवसांपासून अल्पशा प्रमाणात पाणीटंचाई जाणवत होती. मात्र त्यातुन पाण्याची काटकसर करत शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील ऊस, भुईभूग, डाळिंब, मका आदी पिके जगवली होती. शेतीसाठी व जनावरांसाठी त्वरित घोडनदीपात्रात पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार व श्रीगोंद्याचे आमदार बबनराव पाचपुते यांच्याकडे केली होती. शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला ऊस, कांदा, भुईभूग, डाळींब आदी पिकांना या आवर्तनाचा मोठा फायदा होणार आहे.
हे शेवटे आवर्तन शेतकऱ्यांनो पाणी जपून वापरा
घोडधरणातून नदीपात्रात हे शेवटचे आवर्तन असून यानंतर धरणात मृत पाणीसाठा शिल्लक राहणार असून नदीपात्रात यानंतर पाणी सोडण्यात येणार नाही. शेतकऱ्यांनी जपून पाण्याचा वापर करावा तसेच या आवर्तनात सहा बंधारे 35 टक्के भरतील, असे शाखा अभियंता रवींद्र देशमुख यांनी सांगितले.
फोटोओळी: चिंचणी येथील घोडधरणातून तीन दरवाज्यांतून सोडलेले पाणी.