पेठांत सायकल योजना अशक्य; पुणे पालिकेच्या सायकल आराखड्यास ‘व्हेईकल फ्री’ भागातच यश?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 01:32 PM2017-12-18T13:32:40+5:302017-12-18T13:36:54+5:30
पुणे महापालिकेने सायकल आराखड्यास मंजुरी दिली असली तरी शहरात निर्माण झालेल्या वाहतूक समस्येमुळे सायकल वापरावर मोठा परिणाम झाला आहे. देखभाल-दुरुस्ती न केल्याने या ट्रॅकवरून सायकल चालविणे अवघड झाले आहे.
पुणे : महानगरपालिकेने सायकल आराखड्यास मंजुरी दिली असली तरी शहरात निर्माण झालेल्या वाहतूक समस्येमुळे सायकल वापरावर मोठा परिणाम झाला आहे. त्यातच पालिकेने तयार केलेल्या सायकल ट्रॅकची वेळोवेळी देखभाल-दुरुस्ती न केल्याने या ट्रॅकवरून सायकल चालविणे अवघड झाले आहे.
परिणामी गेल्या काही वर्षांपासून सायकल केवळ व्यायामापुरतीच उरली आहे. शहरातील अरुंद रस्ते मोठे करणे शक्य नसल्याने पेठांमधील भागात सायकल योजना राबविणे अशक्य आहे. मात्र, ‘व्हेईकल फ्री’ भागात ही योजना चांगल्या प्रकारे राबविता येऊ शकते, असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे. शहरातील वाहतूककोंडीचा प्रश्न गंभीर झाला आहे. शहरातील मध्यवर्ती भागातील अरुंद रस्त्यांवर वाहतूककोंडीला नागरिकांना दररोजच सामोरे जावे लागत आहे. शहरातील सार्वजनिक वाहतूक अधिक सुलभ व दर्जेदार होणे आवश्यकता आहे. पुण्याची एकूण वाहतुकीची परिस्थिती विचारात घेऊन शहरातील वाहतूक यंत्रणेत परिवर्तन घडवून आणण्यासाठीच पालिकेने ‘सायकल शेअरिंग योजना’ सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र, ही योजना प्रत्यक्षात राबविणे सोपे नाही. शहरातील मध्यवर्ती रस्त्यावरील अरुंद रस्ते आता मोठे करता येणार नाहीत. त्यामुळे पेठांमधील भागात स्वतंत्र सायकल ट्रॅक तयार करणे केवळ अशक्य आहे. परिणामी शहरातील विशिष्ट रस्ते मोटर व चारचाकी मुक्त अर्थात व्हेईकल फ्री करावी लागतील. तेव्हाच ही योजना अस्तित्वात आणता येईल, असे मत सायकल विक्रेत्यांकडून व्यक्त केले जात आहे.
सायकलविक्रीचा व्यवसाय करणारे रितेश सुराणा म्हणाले, पेठांमधील रस्ते लहान आहेत. त्यामुळे पेठांचा परिसर ‘व्हेईकल फ्री’ केल्यास सायकल शेअरिंग योजना यशस्वी होऊ शकते. मात्र, त्यासाठी पेठांच्या सभोवताली चारचाकी व दुचाकीसाठी मोठे पार्किंग सेंटर स्थापन करावे लागतील. ज्येष्ठ नागरिक, रुग्ण, अंध, अपंग, लहान मुले यांच्यासाठी बॅटरीवर चालणारी वाहने उपलब्ध करून द्यावी लागतील. त्याचप्रमाणे रस्त्यावर कुठेही अतिक्रमण होणार नाही याची काळजी पोलीस व पालिका प्रशासनाला घ्यावी लागेल. एखादा रस्ता वाहतुकीसाठी एकेरी केला तरीही नागरिकांकडून मोठा संताप व्यक्त केला जातो. त्यामुळे एखाद्या विशिष्ट परिसरातील रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहनांना बंदी घालणे सहज शक्य होईल, असे वाटत नाही. त्यामुळे नागरिकांना विश्वासात घेऊनच याबाबतचा निर्णय घ्यावा लागेल, असेही मत व्यक्त केले जात आहे.
वाहतुकीचा प्रश्न बनतोय जटिल
शहरात प्रत्येक महिन्याला दुचाकी व चारचाकी वाहनांची संख्या वाढत आहे. त्यामुळे शहरातील वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस अधिकच ऐरणीवर येत आहे. शहरात दुचाकी व चारचाकी वाहनांना होणाऱ्या अपघातांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे कोणताही पालक आपल्या मुलाला सायकलवरून शाळेत पाठविण्यास तयार नाही.
परिणामी विद्यार्थी स्कूल बस, रिक्षा किंवा दुचाकीवरून शाळेत येतात. मात्र, नामांकित शाळांजवळचा तीन किमीपर्यंतच्या रस्त्यावर सायकल ट्रॅक उभे केले तर विद्यार्थी सायकलवरून शाळेत येऊ शकतील. त्यामुळे पूर्वी तयार केलेल्या सायकल ट्रॅकची दुरुस्ती करण्याबरोबरच नवीन सायकल ट्रॅक तयार करावे लागणार आहेत.
कोणत्या सायकलला आहे मागणी?
जुन्या भारतीय बनावटीच्या सायकल आता केवळ किरकोळ वाहतुकीसाठी वापरल्या जातात. त्यांना लेबर सायकल म्हणून उल्लेखले जाते. त्यांना ग्राहकांकडून अत्यंत कमी मागणी आहे. बाजारात लहान मुलांच्या सायकलला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. त्यामुळे लहान मुलांसाठी बाजारात आकर्षक सायकल उपलब्ध करून दिल्या जातात. ३ ते १० वर्षांच्या मुलांकडून भारतीय व परदेशातील बनावटीच्या अनेक सायकल्सला पसंती दिली जाते. साधारणपणे इयत्ता आठवी ते दहावीपर्यंतचे काही विद्यार्थी सायकल वापरतात. त्यामुळे त्यांच्यासाठी सायकल दुकानांमध्ये आकर्षक व गिअरच्या सायकल्स उपलब्ध आहेत. मात्र, पालक मुलांना सायकलवर शाळेत पाठवण्यास तयार नसल्याने या सायकल्सलासुद्धा फारशी मागणी नाही. वजन वाढल्याने होणारे आजार टाळण्यासाठी डॉक्टरांकडून रुग्णांना सायकल चालविण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे गेल्या काही वर्षांत गिअरच्या आणि महागड्या सायकल्सच्या विक्रीत वाढ होत आहे. त्यातही मी किती महागडी सायकल विकत घेऊन चालवतो आहे, हे दाखविण्याची फॅशन झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून बांबूपासून तयार केलेली सुमारे ५० हजार रुपयांची सायकल संग्रहित ठेवणाऱ्यांची संख्याही वाढत आहे
आता घरातील प्रत्येक लहान मुलाला स्वत:ची सायकल हवी असते. सर्वसाधारणपणे तीन-चार वर्षांपासून ते इयत्ता दहावीपर्यंतची मुले सायकल चालवतात. त्यामुळे लहान मुलांच्या सायकलचा खप वाढला आहे. परंतु, शहरात सायकल चालवणे पालकांना धोकादायक वाटत असल्याने बहुतांश मुले शाळेत सायकलवर येत नाहीत. व्यायाम करून वजन कमी करण्यासाठीचे सायकल हे महत्त्वाचे साधन आहे, या दृष्टीने श्रीमंत सायकलकडे पाहत आहेत. त्यामुळे सायकल हे गरिबांचे नाही तर श्रीमंतांचे वाहन झाले आहे. परंतु, पालिकेने सायकल योजना योग्य पद्धतीने राबविली तर ती यशस्वी होऊ शकते.
- रितेश सुराणा, सायकलविक्री व्यावसायिक
शहरात सायकल ट्रॅक नाही, सायकल स्टँड नाही. तसेच सायकल चोरीला जाण्याची भीती असल्याने रस्त्यावर कुठेही सायकल सोडून जाता येत नाही. त्यामुळे सध्या केवळ लहान मुलांच्या सायकलसह स्पोर्ट व गिअरच्या सायकलला मोठी मागणी आहे. जुन्या पद्धतीच्या सायकलचा वापर केवळ कुरिअर किंवा हलक्या वस्तूंच्या वाहतुकीसाठी होतो. त्यामुळे या सायकल खूप कमी विकल्या जातात. अपघाताच्या भीतीने पालक मुलांना शहरात सायकल चालवण्यास देत नाहीत.
- परमजित सिंग, सायकलविक्री व्यावसायिक
विद्यापीठाचा परिसर बंदिस्त असून विद्यापीठातील विद्यार्थी सुरुवातीला सायकल वापरतील. त्यामुळे विद्यापीठात सायकल शेअरिंग योजना यशस्वी होऊ शकते. मात्र, संपूर्ण शहरात ही योजना राबवण्यात अनेक अडचणी आहेत. केवळ हस्तीदंती मनोऱ्यात बसून निर्णय घेण्याऐवजी नगरसेवकांनी स्वत: सायकलने प्रवास करण्याचे उदाहरण घालून द्यावे. त्या वेळी त्यांना सायकल योजना सुरू करण्याबाबतच्या अडचणी समजू शकतील आणि त्यावर उपाययोजना करता येतील. केवळ केंद्राकडून आलेला निधी खर्च करण्यासाठी योजना राबवू नये तर ती यशस्वी करून दाखवावी.
- विवेक वेलणकर, सजग नागरिक मंच