लंडनच्या धर्तीवर पुण्यातही सायकल शेअरिंग
By admin | Published: March 2, 2016 01:18 AM2016-03-02T01:18:57+5:302016-03-02T01:18:57+5:30
लंडनमध्ये सार्वजनिक वाहतुकीचा एक भाग म्हणून सर्वाधिक यशस्वी ठरलेली सायकल शेअरिंग सिस्टिम पुण्यात राबविण्यात येणार असल्याची माहिती लंडनच्या दौऱ्यावर असलेले महापालिकेचे
पुणे : लंडनमध्ये सार्वजनिक वाहतुकीचा एक भाग म्हणून सर्वाधिक यशस्वी ठरलेली सायकल शेअरिंग सिस्टिम पुण्यात राबविण्यात येणार असल्याची माहिती लंडनच्या दौऱ्यावर असलेले महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी दिली. लंडनमधील वाहतूक, घनकचरा व पाणी व्यवस्थापनाशी संबंधित प्रकल्पांना त्यांनी भेटी देऊन त्याची माहिती घेतली.
युकेमधील स्मार्ट प्रकल्पांची माहिती घेण्यासाठी कुणाल कुमार यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेतील अधिकाऱ्यांचे पथक अभ्यास दौऱ्यावर गेले आहे. या पथकाने सोमवारी दिवसभर लंडनमधील विविध प्रकल्पांना भेटी दिल्या. याबाबत कुणाल कुमार यांनी सविस्तर माहिती दिली.
कुमार यांनी सांगितले, ‘लंडनमध्ये बस, केबलकार, टॅक्सी, सायकल या सर्व सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था ‘ट्रान्सपोर्ट फॉर लंडन’ या एकाच संस्थेकडून पाहिली जाते. या संस्थेच्या कार्यालयास आम्ही भेट दिली. सायकल शेअरिंग सिस्टिम अंतर्गत लंडन शहरामध्ये दररोज १२ हजार सायकली भाडे तत्त्वावर दिल्या जातात. त्यासाठी एक कंट्रोल रूम तयार करण्यात आली असून, तेथून संपूर्ण शहरात नियंत्रण ठेवले जाते. उत्कृष्ट पद्धतीने त्याचे नियोजन केले जात असून, पुण्यामध्ये हा प्रयोग राबविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी त्यांच्याशी स्वतंत्रपणे संपर्क साधला जाणार आहे.’
शहरातील वाहतुकीचा शास्त्रीय पद्धतीने सर्व्हे करण्यासाठी एका खासगी संस्थेने चांगली व्यवस्था विकसित केली आहे. सर्वसाधारण सर्व्हेमध्ये खूपच कमी लोकांपर्यंत पोहोचता येते. या व्यवस्थेअंतर्गत वाहतुकीचे विविध प्रकारचे सर्व्हे करून नागरिकांच्या सार्वजनिक वाहतुकीबाबतच्या गरजा जाणून घेता येऊ शकतील. एकूण लोकसंख्येच्या २५ टक्के लोकांपर्यंत या व्यवस्थेच्या माध्यमातून पोहोचता येते. ही सर्व्हेची प्रणाली पुण्यासाठी खूपच फायदेशीर ठरू शकेल. त्याकरिता संबंधित संस्थेला याचे तपशीलवार सादरीकरण करण्यासाठी पुण्यामध्ये आमंत्रित करण्यात आले आहे.’
घनकचरा उचलण्यासाठी राबविण्यात येणारी सेन्सर प्रणालीला आम्ही भेट दिली. त्याचबरोबर पाण्याची पाइपलाइन फुटण्यापूर्वीच तिची दुरुस्ती करण्याची एक सुरेख व्यवस्था तिथे निर्माण करण्यात आली आहे, त्याची आम्ही सविस्तर माहिती घेतली. पुण्यामध्ये २४ तास पाणी पुरवठा योजना राबविण्यात येणार आहे, त्याअंतर्गत या प्रणालीचा वापर करता येऊ शकेल. यामुळे पाण्याची नासाडी वाचविता येऊ शकेल, असे कुमार यांनी स्पष्ट केले. घनकचरा, पाणी, वाहतूक व्यवस्थेशी संबंधित प्रकल्पांना दिवसभर भेटी देण्यात आल्या. बुधवारी प्रिस्ट्रल शहराच्या महापौरांशी भेट नियोजित आहे, अशी माहिती कुणाल कुमार यांनी दिली.