स्मार्ट सिटीचेही सायकल शेअरिंग, परदेशी कंपनीचा सहभाग, महापालिकेलाही पाठवले पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 03:50 AM2017-11-29T03:50:37+5:302017-11-29T03:50:53+5:30

महापालिका करणार असलेली सायकल शेअरिंग योजना पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनी त्यांच्या औंध-बाणेर-बालेवाडी या विशेष क्षेत्रातही राबवणार आहे.

 Cycle sharing of Smart City, Participation of foreign companies, letter sent to Municipal Corporation | स्मार्ट सिटीचेही सायकल शेअरिंग, परदेशी कंपनीचा सहभाग, महापालिकेलाही पाठवले पत्र

स्मार्ट सिटीचेही सायकल शेअरिंग, परदेशी कंपनीचा सहभाग, महापालिकेलाही पाठवले पत्र

Next

पुणे : महापालिका करणार असलेली सायकल शेअरिंग योजना पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनी त्यांच्या औंध-बाणेर-बालेवाडी या विशेष क्षेत्रातही राबवणार आहे. त्यासाठी त्यांना तीन परदेशी कंपन्यांनी अत्याधुनिक सायकली पुरवण्याचा प्रस्ताव दिला असून, त्यातील दोन कंपन्यांनी सायकलींची ट्रायल करून दाखवण्याची तयारी दाखवली आहे.
डिसेंबरच्या दुसºया आठवड्यात ही ट्रायल होणार आहे. त्यासाठी बाणेरमध्ये कंपनीने तयार केलेला रस्ता निश्चित करण्यात आला आहे. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ क्षेत्रातही ही ट्रायल घेण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांची परवानगीही काढली आहे. महापालिकाही पुणे शहरात अशीच योजना राबवणार असून, स्थायी समिती व सर्वसाधारण सभेनेही त्यासाठी मान्यता दिली आहे. १ लाख सायकली, उपनगरे व शहराचा मध्यभाग मिळून ५३१ किलोमीटरचे सायकल ट्रॅक, त्यात ३१ किलोमीटरचे ग्रीन ट्रॅक, महत्त्वाच्या सर्व ठिकाणी सायकल स्टेशन्स असणार आहेत.
स्मार्ट सिटी कंपनीनेही अशाच योजनेचा प्रस्ताव त्यांच्या क्षेत्रासाठी तयार केला होता. त्यांना परदेशातील तीन कंपन्यांनी सायकली पुरवण्याचा प्रस्ताव दिला. त्यांना कंपनीच्या वतीने काही अटी घालण्यात आल्या आहेत. त्यात प्रामुख्याने या सर्व सायकली अत्याधुनिक असणार आहेत. त्यांना नव्या प्रकारची तांत्रिक सुरक्षा असेल. म्हणजे त्या कुठेही लावल्या तरी मालकाशिवाय कोणालाही नेता येणार नाहीत. त्यांचे पैसे कंपनी देणार नाही. भाडेतत्त्वावर या सायकली देताना अत्यंत कमी दर आकारला जाईल. प्रतिसाद दिलेल्या तीन कंपन्यांपैकी दोन कंपन्यांनी या सर्व अटी मान्य केल्या आहेत. आपल्या सायकली नेमक्या अशाच असल्याचा दावा करून त्यांनी त्याची ट्रायल देण्याचीही तयारी दर्शवली. त्यामुळे कंपनीच्या वतीने त्यांना डिसेंबरमध्ये ट्रायल देण्यास सांगितल्याप्रमाणे कंपनीने महापौर मुक्ता टिळक, पोलीस आयुक्त यांच्या उपस्थितीत डिसेंबरमध्ये ट्रायल आयोजित केली आहे. एका कंपनीच्या सायकली शहरात दाखलही झाल्या आहेत.
वाहतूक शाखेलाही कंपनीने या योजनेची पूर्वकल्पना दिली असून, त्यांची मान्यता घेतली आहे. औंध-बाणेर, बालेवाडी येथे कंपनीच्या वतीने प्रशस्त व आकर्षक रस्ता (ब्रेमेन चौक ते परिहार चौक) तयार करण्यात आला आहे. त्याच पद्धतीने आणखी काही रस्तेही विकसित करणार आहेत. कंपन्यांनी दिलेले प्रस्ताव संचालक मंडळाच्या बैठकीत ठेवण्यात येतील. त्यावर चर्चा होईल व मान्यता मिळाली की मग त्या रस्त्यांवरही सायकल शेअरिंग योजना राबवण्यात येईल.
दरम्यान, पुणे महापालिकाही याच प्रकारची योजना राबवत असल्याचे समजल्यानंतर स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने त्यांच्याकडे आलेले तीन कंपन्यांचे प्रस्ताव पालिकेकडेही पाठवण्यात आले आहेत. त्यात स्मार्ट सिटी कंपनीच्या विशेष क्षेत्रात अशीच योजना राबवणार असून, सर्व ठिकाणी ही योजना राबवण्याचा विचार असल्यास त्यात स्मार्ट सिटी कंपनीला स्वारस्य असल्याचे म्हटले आहे. बस, रिक्षा किंवा भविष्यात मेट्रोमधून उतरल्यानंतर संबंधिताला थेट इच्छित स्थळी जाण्यासाठी ही सायकल शेअरिंग योजना उपयोगी पडू शकेल. त्यामुळे ही योजना राबवण्यासाठी या कंपन्यांचा प्राधान्याने विचार करावा, असे सुचवण्यात आले आहे.

स्मार्ट सिटी कंपनीच्या क्षेत्रात ही योजना राबवणार असल्याचे समजल्यानंतर परदेशातील काही सायकल कंपन्यांनी संपर्क केला. त्यातील तीन कंपन्यांचा प्रस्ताव चांगला वाटल्यानंतर त्यांच्याकडून आणखी माहिती मागवण्यात आली. महापालिकाही अशीच योजना राबवणार असल्याचे समजल्यानंतर त्यांना ही सर्व माहिती पाठवण्यात आली आहे. पर्यावरण संवर्धनाबरोबरच आरोग्य व अन्य अनेक गोष्टींसाठी ही योजना उपयुक्त आहे. - राजेंद्र जगताप,
मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनी.

Web Title:  Cycle sharing of Smart City, Participation of foreign companies, letter sent to Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे