Pune: भरधाव डंपरच्या धडकेत सायकलस्वाराचा मृत्यू, चालकाविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2024 01:40 PM2024-02-04T13:40:07+5:302024-02-04T13:45:01+5:30
नगर रस्त्यावरील खराडी भागातून यादव सायकलवरून निघाला असताना भरधाव डंपरने सायकलस्वार यादवला धडक दिली...
पुणे : भरधाव डंपरच्या धडकेत सायकलस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना नगर रस्त्यावरील खराडी भागात घडली. याप्रकरणी डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ध्रुव कुमार यादव (३०, रा. कुकरीपूर, तुर्कीपूर, जि. बस्ती, उत्तरप्रदेश) असे मृत्युमुखी पडलेल्या सायकलस्वाराचे नाव आहे. याबाबत जमालुद्दीन सय्यद (३०, रा. उबाळेनगर, वाघोली ) याने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यादव हा मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. तो वाघोली परिसरात मजुरी करत होता. नगर रस्त्यावरील खराडी भागातून यादव सायकलवरून निघाला असताना भरधाव डंपरने सायकलस्वार यादवला धडक दिली. गंभीर जखमी झालेल्या यादवचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. अपघातानंतर डंपर चालक पसार झाला. पसार झालेल्या डंपर चालकाचा शोध घेण्यात येत असून, सहायक पोलिस निरीक्षक सिद्धनाथ खांडेकर पुढील तपास करत आहेत.