भोरगिरी, भिवेगावला चक्रीवादळाचा तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:09 AM2021-05-17T04:09:51+5:302021-05-17T04:09:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क राजगुरुनगर: खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील भोरगिरी व भिवेगाव या गावात चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. ८७ राहत्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
राजगुरुनगर: खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील भोरगिरी व भिवेगाव या गावात चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. ८७ राहत्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच, दोन जिल्हा परिषद शाळा व ग्रामपंचायतीचे अंगणवाडीचे वादळी वाऱ्याने इमारतीचे नुकसान झाले आहे. या परिसरातील नुकसानग्रस्त ग्रामस्थांचे शासकीय पंचनामे करून त्यांना नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी पुणे जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी केली असून खेड प्रशासनाला सूचना दिल्या आहे.
चक्रीवादळाने तालुक्याच्या पश्चिम भागात दि.१६ रोजी पहाटेच्या सुमारास जोरदार चक्रीवादळ होऊन पाऊस पडला. या चक्रीवादळाच्या तडाख्यात भोरगिरी व भिवेगाव या परिसरात या चक्रीवादळाचा फटका नागरिकांना बसला आहे. सुमारे ८७ घरांचे जवळपास ५० टक्के नुकसान झाले आहे. काही घराच्या कौले, पत्रे उडून गेले तर भिंती कोसळल्या आहेत. २ अंगणवाड्या व १ प्राथमिक शाळा, १ ग्रामपंचायत इमारत यांचे नुकसान झाले आहे. चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची पाहणी जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, खेड उपविभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण, पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकर, गटशिक्षण अधिकारी संजय नाईकडे, माजी सभापती अकुंश राक्षे, अरूण चांभारे, सुखदेव पानसरे, खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश गुरव ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर, मा. उपसभापती विठ्ठल वनघरे, तसेच या परिसरातील तलाठी व पोलीस पोटील, सरपंच व उपसरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते. पानसरे यांनी पाहाणी करून नुकसानग्रस्त नागरिकांची भेट घेऊन चर्चा करून पुढील कार्यवाहीच्या सूचना देऊन नागरिकांना दिलासा दिला. 'नुकसानग्रस्त घरांचे तत्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई मिळावी. वीजदुरुस्तीची कामे करून खंडित वीजपुरवठा सुरळीत करावा, हवामान बदलामुळे साथीच्या आजारावर मात करण्यासाठी परिसरातील वैद्यकीय सेवा सुरळीत सुरू राहण्यासाठी मदत करावी. लवकरच पश्चिम भागातील लोकांची विस्कळीत झालेली घडी बसवण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मदत करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे पुणे जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी सांगितले. तसेच, या वेळी खेड प्रशासनाला उपाययोजना व पंचनामे करण्याच्या या वेळी सूचना पानसरे यांनी केल्या.
फोटो ओळ., भिवेगाव, ता. खेड येथे वादळी वाऱ्यात शाळेचे पत्रे उडून गेले.
फोटो ओळ. . घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.