Maharashtra: चक्रीवादळ येतंय, महाराष्ट्रातील वातावरणावर काय परिणाम होणार?
By श्रीकिशन काळे | Published: October 19, 2023 06:48 PM2023-10-19T18:48:59+5:302023-10-19T18:49:24+5:30
येत्या २६ ऑक्टोबरनंतर हे वादळ पुढे सरकत ओमानच्या दिशेने निघून जाण्याची शक्यता आहे...
पुणे : अरबी समुद्रात केरळच्या कोचीन-अल्लेप्पी अक्षवृत्तादरम्यान व लक्षद्वीप बेटांच्या अति पश्चिमेकडे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. येत्या २६ ऑक्टोबरनंतर हे वादळ पुढे सरकत ओमानच्या दिशेने निघून जाण्याची शक्यता आहे. परंतु महाराष्ट्रात त्याचा कोणताही परिणाम होण्याची शक्यता नाही. दक्षिण पाकिस्तान अथवा कच्छ किनारपट्टीमार्गे देशाच्या भू-भागावर प्रवेशित होण्याची शक्यता कमी जाणवते, असा अंदाज हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला.
बंगालच्या उपसागरात श्रीलंकेच्या कोलोम्बो शहराच्या अक्षवृत्तावर पश्चिमेकडे दक्षिण ब्रह्मदेशाच्या पश्चिम किनारपट्टीवर आज तयार झालेल्या चक्रीय वाऱ्याच्या स्थितीचे रूपांतर २१ ऑक्टोबरला कमी दाब क्षेत्रात रूपांतर होऊन पुढील पायऱ्यांमध्ये विकसित होईल. दक्षिण बांगलादेशाच्या दिशेने निघून जाण्याची शक्यता असून, महाराष्ट्रावर पावसासाठी कोणताही परिणाम होण्याची शक्यता नाही. वायव्येकडून भुवनेश्वरमार्गे देशाच्या भूभागावर प्रवेशित होण्याची शक्यता कमी जाणवते. ऑक्टोबर २५ पर्यंत महाराष्ट्रात ऑक्टोबर हिटचा परिणाम कायम असू शकतो.
आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. उद्या पुणे शहरात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. उकाड्यात वाढ होऊ शकते. पुणे परिसरात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
- अनुपम कश्यपी, प्रमुख, भारतीय हवामानशास्त्र अंदाज विभाग, पुणे