आग्नेय अरबी समुद्रातील चक्रीवादळाने गोवा, कोकण, दक्षिण महाराष्ट्रात पावसाची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:11 AM2021-05-13T04:11:56+5:302021-05-13T04:11:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : आग्नेय अरबी समुद्रात येत्या १४ मे रोजी कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असून, त्याचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : आग्नेय अरबी समुद्रात येत्या १४ मे रोजी कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असून, त्याचे १६ मे रोजी चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. यामुळे पश्चिम किनारपट्टीवर सर्वत्र मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे गोवा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
राज्यात बुधवारी सर्वाधिक कमाल तापमान चंद्रपूर येथे ४३.२ अंश सेल्सिअस, तर सर्वात कमी किमान तापमान महाबळेश्वर येथे १७.४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे.
आग्नेय अरबी समुद्रात १६ मे रोजी कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केरळपासून कोकणापर्यंत सर्वदूर जोरदार पावसाची शक्यता आहे. गोव्यामध्ये १५ मेपासून पावसात वाढ होण्याची शक्यता आहे. उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा जिल्ह्यात १५ व १६ मे रोजी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच, १५ मेपासून सर्वदूर पावसाची शक्यता आहे.
कोकणातही रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात १४ मेपासून तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. १६ मे रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
मच्छीमारांनी या काळात समुद्रात जाऊ नये़ तसेच जे मच्छीमार समुद्रात गेले असतील त्यांनी तातडीने किनाऱ्यावर परत यावे, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
तसेच दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यात १४ ते १६ मेपर्यंत तीनही दिवस वादळी वाऱ्र्यासह पावसाची शक्यता आहे. तसेच बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी १४ ते १६ मे दरम्यान पावसाची शक्यता आहे.
पुणे, अहमदनगर, औरंगाबाद जिल्ह्यात १५ व १६ मे रोजी वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.