Cyclone Tauktae : तौत्के चक्रीवादळाचा पुणे जिल्ह्याला फटका; फळबागा व शेतीचे पंचनामे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 08:07 PM2021-05-17T20:07:06+5:302021-05-17T20:07:42+5:30
३ लोक जखमी, जिल्ह्यात १९० ठिकाणी घरांची पडझड
पुणे : गतवर्षी जून महिन्यात झालेल्या चक्रीवादळाच्या तुलनेत रविवार-सोमवारी झालेल्या तौत्के चक्रीवादळाने जिल्ह्यात कमी नुकसान झाले. घराच्या पडझडीत तीन लोक किरकोळ जखमी झाले तर खेड, मुळशी, भोर, माधळ आणि आंबेगाव तालुक्यात घरांची, काही ठिकाणी शाळा, अंगणवाडी आणि ग्रामपंचायत कार्यालयाचे पत्रे उडाले 190 ठिकाणी पडझड झाली. दरम्यान या चक्रीवादळाचा फळबागांना फटका बसला असून, तातडीने पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले आहेत.
अरबी समुद्रात निर्माण झालेलं आणि अतितीव्र स्वरुपाच्या तौक्ते चक्रीवादळाचा पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सर्व तालुक्याना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. रविवार (दि.16) आणि सोमवार (दि.17) रोजी जिल्ह्यातील काही तालुक्यात या चक्रीवादळाचा चांगला परिणाम दिसून आला. परंतु गतवर्षी जून महिन्यात झालेल्या चक्रीवादळात जीवितहानीसह हजारो घरांचे, लाईटचे खांब, शाळा, अंगणवाड्या, ग्रामपंचायत कार्यालये, पोल्ट्री फार्म, पाॅलीहाऊस यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होते. यामुळेच हवामान विभागाच्या तौक्ते चक्रीवादळाच्या इशाऱ्यानंतर लोकांमध्ये धास्तीचे वातावरण होते. परंतु या वादळात फारसे नुकसान झाले नाही. अद्याप पूर्ण धोका टळला नसून, मंगळवार दुपारपर्यंत सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.
दरम्यान, शिरूर तालुक्यात १ घराची पडछड झालेने २ व्यक्ती यात फिरकोळ जखमी झाल्या आहेत. प्राथमिक उपचारानंतर घरी सोडून देण्यात आले. तर खेड तालुक्यात एका घराची पडछड झालेने व्यक्ती जखमी झालेने सदरव्यक्तीस प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आलेले आहे. बारामती तालुक्यातील विद्युत वाहिनीचा शॉक बसल्याने २ शेळया व २ मेढया मयत झाल्या. मुळशी तालुक्यामध्ये खांबोली गावातील जि. प. प्राथमिक शाळेचे पत्रे उडल्याने नुकसान झालेले आहे. तसंच ताम्हिणी गावाच्या ग्रामपंचायत कार्यालयाचे पत्रे उडाले.
खेड तालुक्यातील दिवेगांव गावातील एक प्राथमिक शाळाचे संपूर्ण पत्रे उडून गेले.भोरगिरी गावातील ग्रामपंचायत व दोन अंगणवाडीचे पत्रे उडून गेले. सद्यस्थितीत घाटमाथा परिसरामध्ये पाऊस पडत असून, नुकसानीचे अंतिम आकडेवारी दोन दिवसांत निश्चित होईल, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे यांनी सांगितले.
------
घोडेगाव - आंबेगाव तालुक्यात तौत्के चक्रीवादळाचा काहि ठिकाणी फटका बसला. तालुक्यातील घाट माथ्यावर राहणाऱ्या मोजक्या काही घरांचे छत उडाले, जुन्या भिंती व झाडे उन्मळून पडली. वाऱ्याला प्रचंड वेग होता, यामध्ये आदिवासी भागातील काही घरांचे छत उडाले तर फलौंदे येथील घराची भिंत पडली.
क्षेत्र भीमाशंकर तसेच डिंभे पासून वर पश्चिम भागात या चक्रीवादळात लाईटच्या पोलवर झाडे पडल्याने सगळया गावांचा विद्युत पुरवठा खंडीत झाला. मागील दोन दिवसांपासून या भागात लाईट नाही. येथील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे काम सुरू होते.
घरांची अशी झाली पडझड
मुळशी -75, भोर-09, मावळ- 10, खेड- 95, आंबेगाव-01
---------