तौक्ते चक्रीवादळाचा कोकण हापूसला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:11 AM2021-05-19T04:11:31+5:302021-05-19T04:11:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : तौक्ते चक्रीवादळाचा मोठा फटका कोकणातील हापूस आंब्याला बसला आहे. हापूस आंब्याचा हंगाम अंतिम ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : तौक्ते चक्रीवादळाचा मोठा फटका कोकणातील हापूस आंब्याला बसला आहे. हापूस आंब्याचा हंगाम अंतिम टप्प्यात असताना चक्रीवादळामुळे शिल्लक आंब्याचे नुकसान झाले आहे. यामुळेच आता केवळ पाचसहा दिवसच पुणेकरांना कोकणच्या हापूसची चव चाखता येणार आहे.
गेल्या वर्षी आलेले निसर्ग चक्रीवादळ तसेच कोरोनाचा परिणाम उत्पादनावर झाल्याने यंदा आवक कमी होती. त्यातच दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळामुळे आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता पाच ते सहा दिवसांत हंगाम संपण्याचा अंदाज व्यापारी वर्तवित आहेत. किरकोळ बाजारात रत्नागिरी हापूसच्या एका डझनाची विक्री २५० ते ७०० रुपये दराने केली जात आहे.
कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड भागातून आंबा दाखल होत आहे. शहरात दररोज दीड ते दोन हजार पेट्यांची आवक होत आहे. गतवर्षी निसर्ग चक्रीवादळ आणि कोरोनाचा तडाखा बसला. कोरोनाचा प्रादुर्भाव पुढील किती दिवस राहील याची शाश्वती नाही. परिणामी, नेहमीच्या तुलनेत यंदा उत्पादनात घट होऊन आवक कमी होती. कोरोनाच्या पहिल्या लाटेतून सावरत असताना दुसऱ्या लाटेमुळे राज्यात लागलेल्या लॉकडाऊनमुळे नागरिकांचे आर्थिक गणित बिघडले. त्याचाही यंदा परिणाम आंब्याच्या मागणीवर झाला, अशी माहिती मार्केटयार्डातील हापूस आंब्याचे व्यापारी अरविंद मोरे यांनी दिली.
-------
सध्यस्थितीत बाजारात आंब्याची अत्यल्प आवक होत आहे. अक्षय्य तृतीयेनंतर मागणीही कमी झाल्याने गेल्या आठवड्याच्या तुलनेत आंब्याच्या दरात सुमारे १० ते २० टक्क्यांनी घट झाली आहे. कोकण किनारपट्टीला वादळाचा जबरदस्त तडाखा बसला आहे. वादळाने झाडावरील आंबे गळून पडले आहेत. त्यामुळे आता आंब्याची आवक जवळपास संपेल. सध्या बाजारात दाखल झालेला कच्चा आंबा पिकवून त्याची पाच ते सहा दिवस विक्री सुरू राहील.
- अरविंद मोरे, आंब्याचे व्यापारी
-------
मार्केट यार्डातील हापूसचे दर
रत्नागिरी हापूस कच्चा (रुपये) तयार (रुपये)
४ ते ६ डझन १००० ते १५०० १००० ते २५००
५ ते १० डझन १००० ते २५०० १५०० ते ३०००