मुळशीत रिंगरोड विरोधात चक्रीउपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:08 AM2021-07-03T04:08:24+5:302021-07-03T04:08:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क घोटवडे : रिंगरोड विरोधात बाधितांनी त्यांच्या समस्या अधिकाऱ्यांपुढे मांडल्या. अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचे केवळ म्हणने ऐकूण घेतले. मात्र, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
घोटवडे : रिंगरोड विरोधात बाधितांनी त्यांच्या समस्या अधिकाऱ्यांपुढे मांडल्या. अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचे केवळ म्हणने ऐकूण घेतले. मात्र, त्यावर अद्यापही काहीच भूमिका न मांडल्यामुळे अखेर मुळशी तालुक्यातील ६५० रिंगरोडबाधित शेतकऱ्यांनी प्रांताधिकारी कार्यालयासमोर संत तुकाराम महाराज गाथा वाचनाचे चक्रीउपोषण सुरू केले आहे.
मुळशीतील जवळपास ६५० शेतकरी रिंगरोडबाधित आहेत. या रिंगरोडला शेतकऱ्यांनी अनेक हरकती नाेंदवल्या होत्या. त्यासंदर्भात महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी प्रांताधिकारी, तहसीलदार, भूमिअभिलेख जिल्हा उपअधीक्षक व एमएसआरडीएच्या अधिकाऱ्यांच्या भेटी घेत त्यांना निवेदने, हरकती सादर केल्या. प्रांताधिकारी संदेश शिर्के यांना भेटून त्यांच्या समस्याही कथन केल्या. मात्र, केवळ त्याचा स्वीकार अधिकाऱ्यांनी केला. उत्तर मात्र देण्याचे टाळले. अधिकाऱ्यांनी वारंवार गावोगावी बैठका घेतल्या. शेतकऱ्यांचे प्रश्न व अधिकाऱ्यांची तीच ठराविक उत्तरे ऐकून शेतकरी थकून गेले. शेतकऱ्यांचा विरोध असताना सुद्धा शासनाने पोलीसबळाचा धाक दाखवून मोजणी केली व शेतकऱ्यांच्या हक्कावर गदा आणली. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी शांततामय मार्गाने प्रांताधिकारी कार्यालयासमोर संत तुकाराम महाराज गाथा वाचन चक्रीउपोषण सुरू केले.
गेल्या महिन्यात मंगळवारी (दि. २९) रिहे, पडळघर वाडी येथील व दुसऱ्या दिवशी बुधवारी (दि. ३०) जवळ व केमसेवाडी येथील बाधित शेतकरी उपोषणास बसले. उद्या मारणेवाडी, उरावडे , आंबेगाव, या गावांतील शेतकरी उपोषण करतील व नंतर इतर गावे आळीपाळीने उपोषणास बसणार आहेत. गुरुवारी जवळ व केमसेवाडी येथील शेतकऱ्यांनी प्रांताधिकारी यांना रिंगरोडमध्ये बाधित बागायत जमिनी वाचवा, रिंगरोड ३० मीटरचा करावा, रिंगरोड बंदिस्त नसावा खुला असावा, रिंगरोडला नागमोडी वळणे नसावी, रिंगरोडमुळे शेतकऱ्यांना व बाधित गावांचा सर्वांगीण विकास व्हावा व फक्त विकसकाचा नको, रिंगरोड बाधित शेतकऱ्यांना सरकारी नोकरी मिळावी, रिंगरोड बाधित शेतकऱ्यांच्या हक्कास बाधा नको असे निवेदन दिले. याप्रसंगी धोंडिबा केमसे, दत्तात्रय घारे, दत्तात्रय केमसे, रोहिदास लांडगे, प्रकाश केमसे, हर्षद केमसे, आकाश केमसे, गणेश घारे, आनंद केमसे, अमोल केमसे, अनंता घारे, राम केमसे आदी शेतकरी उपोषणाला बसले.
फोटो आहे :