सोमेश्वरनगर परिसरात घरगुती गॅसचा स्फोट होवून आग, मोलमजुरी करणारे कुटुंब उघड्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2019 08:12 PM2019-04-02T20:12:00+5:302019-04-02T20:15:13+5:30
निरा-बारामती रस्त्याच्या शेजारील डॉ.आंबेडकर वसाहतीला मंगळवारी (दि. २) रोजी दुपारी घरगुती गॅसचा स्फोट झाला
सोमेश्वरनगर : वाघळवाडी (ता. बारामती) येथील निरा-बारामती रस्त्याच्या शेजारील डॉ.आंबेडकर वसाहतीला मंगळवारी (दि. २) रोजी दुपारी घरगुती गॅसचा स्फोट झाला.या स्फोटाने लागलेल्या आगीत चार झोपड्या जळून खाक झाल्या. या आगीत गरीब कुटूंबातील मोलमजुरी करणाऱ्या चार कुटुंबाचे आर्थिक नुकसान झाले आहे.
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची आणि ज्युबलियंट कंपनीच्या दोन अग्निशामक बंबाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या.त्यामुळे वेळेवर आग विझवण्यात यश आल्याने मोठा अनर्थ टळला. याठिकाणी मोलमजुरी करणाऱ्या ग्रामस्थांची जवळपास २५ घरांची झोपडपट्टी आहे. झोपडीच्या चारी बाजूने पाचटापासून तयार केलेल्या भिंती तसेच छतावर पत्रा होता. त्यामुळे एका झोपडीतुन दुसऱ्या झोपडील आग लागली.
मंगळवारी दुपारी घरातील गॅसला अचानक आग लागल्याने या आगीत एक शेळी आणि कोंबड्या मरण पावल्या .तर घरातील संसारउपयोगी साहित्य, धान्य, टीव्ही, कपाट, घरातील विद्यार्थ्यांचे शालेयसाहित्य आदी चार कुटुंबाचे मिळून अंदाजे दोन ते अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.कल्पना शहाजी खांडेकर, प्रमिला दर्याप्पा गोडसे, जमुनाबाई परशुराम घाडगे आणि शालन अशोक कोकरे असे झोपड्या जळालेल्या कुटुंबाची नावे आहेत. घटना घडल्यानंतर ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य करत मदत केली.
ऐन उन्हात आग लागल्याने परीसरात आगीचे लोट तयार झाले होते. वाघळवाडीचे ग्रामसेवक सुभाष चौधर, वडगाव निंबाळकरचे पोलिस कर्मचारी महेंद्र फणसे, नितीन बोराटे तसेच एचपी गॅसच्या कर्मचाºयांनीही घटनास्थळी भेट दिली.
————————————————————
छोट्या श्रावणीचे धाडस.....
सुरुवातीला कल्पना खांडेकर यांच्या घराला आग लागली. यावेळी कल्पना खांडेकर या कामावर गेल्या होत्या. मात्र, त्यांची चौथीत शिकणारी मुलगी श्रावणी एकटीच घरी होती. अचानक तिला तीव्र उष्णता जाणवु लागली. बाहेर येऊन तिने पाहिले तर घराच्या बाहेरील बाजूस आग लागली होती. तिने तो विझवण्याचा भरपूर प्रयत्न केला. मात्र तिच्या प्रयत्नाला यश आले नाहि. त्यामुळे श्रावणीने वेळेचे भान राखून घरातील तीन शेळ्या सोडविल्या. मात्र एक लहान शेळी आणि काही कोंबड्या या घटनेत बळी पडली. आपल्या बोबड्या आवाजात घडलेली घटना तिने सांगितली.या आगीत तिला किरकोळ दुखापत झाली आहे. तीच्या या धाडसाचे परिसरातून कौतुक होत आहे.
——————————————————
ग्रामस्थ करणार मदत...
आज दुपारी अचानक ही घटना घडल्याने या चारही घरातील संसारपयोगी सर्वच साहित्य जळून खाक झाले.या घटनेने ही कुटुंब उघड्यावर पडली. वाघळवाडी ग्रामस्थ या कुटुंबाना घरे उभारण्यासाठी पत्रे उपलब्ध करून देणार आहे. गावातील इतर लोकांनी त्याच्या जेवणाची व कपड्यांची जबाबदारी उचलली आहे.
————————————
...आता मी अभ्यास कसा करू
या आगीत सर्वच साहित्यासह शाळकरी मुलाची व पुस्तके जळून खाक झाली आहेत, माझी परीक्षा दोनच दिवस झाली सुरू झाली आहे. आता मी अभ्यास कसा करू असे, भावनिक होऊन श्रावणी सांगत होती. यावेळी भारत ज्ञान विज्ञान संघटनेने श्रावणी सह जळीत कुटुंबातील सर्वच शाळकरी मुलांच्या कपडे व आणि पुस्तकांनी तातडीने सोय केली.