सिलिंडर स्फोटाने इमारतीला तडे

By admin | Published: February 5, 2016 02:25 AM2016-02-05T02:25:40+5:302016-02-05T02:25:40+5:30

कोथरूडमधील प्रज्ञाभूषण सोसायटी गुरुवारी रात्री गॅस सिलिंडर स्फोटाने हादरली. गॅसगळतीमुळे एकापाठोपाठ एक अशा दोन सिलिंडरच्या स्फोटांमुळे फ्लॅटमधील किचन

The cylinder blast sticks to the building | सिलिंडर स्फोटाने इमारतीला तडे

सिलिंडर स्फोटाने इमारतीला तडे

Next

पुणे : कोथरूडमधील प्रज्ञाभूषण सोसायटी गुरुवारी रात्री गॅस सिलिंडर स्फोटाने हादरली. गॅसगळतीमुळे एकापाठोपाठ एक अशा दोन सिलिंडरच्या स्फोटांमुळे फ्लॅटमधील किचन आणि बेडरूममधील भिंतच तुटली. बचावकार्य करण्यासाठी गेलेल्या अग्निशामक दलाचा एक जवान या घटनेत गंभीर जखमी झाला असून, घरातील एक ज्येष्ठ महिलाही किरकोळ जखमी झाली आहे. सिलिंडर फुटल्यानंतर बसलेल्या दणक्यामुळे इमारतीलाही तडे गेल्याची माहिती कोथरूड अग्निशामक केंद्राचे प्रमुख राजेश जगताप यांनी दिली.
कोथरूडमधील महात्मा सोसायटीमध्ये असलेल्या प्रज्ञा भूषण या सहा मजली इमारतीमध्ये रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील टू बीएचके फ्लॅटमध्ये दिलीप आणि वैभवी दत्तवाडकर हे ज्येष्ठ दाम्पत्य राहते. त्यांच्या घरामधील किचनमध्ये दोन गॅस सिलिंडर होते. बराच वेळ त्यांच्या किचनमध्ये गॅसगळती सुरू होती. घरामध्ये गॅसचा वास कोंडला होता. शेजाऱ्यांना गॅसचा वास आल्यामुळे त्यांनी दिलीप यांना बाहेर बोलावून घेतले. त्यांना गॅसचा वास येत असल्याची माहिती देत असतानाच सिलिंडरचा स्फोट झाला. त्या वेळी घरात त्यांच्या पत्नी होत्या.
घटनेची माहिती मिळताच अवघ्या पाचच मिनिटांत कोथरूड केंद्राचा बंब घटनास्थळी दाखल झाला. बचावकार्यासाठी पाण्याची लाईन घेत असतानाच दुसरा सिलिंडर फुटला. या सिलिंडरच्या दणक्याने किचन आणि बेडरूमची भिंत तुटली. हा स्फोट एवढा तीव्र्र होता की भिंतीच्या विटा हवेत उडाल्या. यातील काही विटा तेथे काम करीत असलेल्या फायरमन संतोष भोसले यांना लागल्या. गंभीर जखमी झालेल्या भोसले यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. तसेच आजूबाजूचा घरांच्या खिडक्यांची तावदानेही फुटली. फुटलेल्या तावदानांच्या काचा लागून वैभवी दत्तवाडकर जखमी झाल्या आहेत. त्यांनाही खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. किचनमधील सिलिंडरच्या चिंध्या झाल्या असून, कागदाप्रमाणे हे सिलिंडर फाटले आहेत.
घरामध्ये आग लागलेली नसल्याचे जगताप यांनी सांगितले. मात्र, बराच वेळ गॅसगळती झाल्याने हा स्फोट झाल्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. या स्फोटामुळे इमारतीलाही तडे गेले आहेत. या भागातील महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडचा (एमएनजीएल) गॅस पुरवठा तत्काळ बंद करण्यात आला आहे. याठिकाणी आग लागलेली नसल्यामुळे घाबरण्याचे कारण नसल्याचे अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, या घटनेची पोलीस चौकशी होण्याची आवश्यकता असल्याचेही एका अधिकाऱ्याने सांगितले. कोथरुड येथील गादी कारखान्याला आग लागल्यामुळे झालेल्या दुर्घटनेत चार कामगारांचा मृत्यू झाला होता. १७ डिसेंबर २०१५ रोजी ही घटना घडली होती. या घटनेनंतरही खबरदारी घेण्यात येत नसल्याचे समोर आले आहे. गेल्या काही दिवसात कोथरुडमध्ये आग लागण्याचे प्रमाण वाढले आहे. सुदैवाने या घटनेत कोणीही गंभीर जखमी झाले नसले तसेच जिवीतहानी झाली नसली तरी घटनेची तीव्रता मात्र मोठी होती. स्फोटांचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांची गर्दी केली होती. काही काळ भितीचे वातावरण पसरले होते. नागरिकांनी तातडीने घटनेची माहिती पोलीस व अग्निशामक दलाला कळवली. दत्तवाडकर यांच्या घरामध्ये स्फोटानंतर फारच विदारक चित्र निर्माण झाले होते. किचन ओटा आणि भांडी घासण्यासाठी असलेला सिंकचे बांधकाम पूर्णपणे तुटले आहे. किचनमधील भांडीही चेंबल्याचे अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. स्फोटाची तीव्रता इतकी होती की, घरातील बेडरूड आणि किचनची भिंत तुटली आहे.

Web Title: The cylinder blast sticks to the building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.