पुण्यातील एका घरामध्ये सिलिंडरचा स्फोट, तीन जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2019 03:32 AM2019-09-21T03:32:43+5:302019-09-21T03:33:03+5:30
कोथरुडमधल्या डहाणूकर कॉलनीत एका घरामध्ये गॅस गळतीमुळे मोठा स्फोट झाला आहे.
पुणेः कोथरुडमधल्या डहाणूकर कॉलनीत एका घरामध्ये गॅस गळतीमुळे मोठा स्फोट झाला आहे. हा स्फोट एवढा भीषण होता की, घराची भिंत आणि इमारतीच्या काचा फुटल्या आहेत. या दुर्घटनेत तीन जण जखमी झाले आहे. अग्निशामक दलानं घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. रात्री 11.30 वाजताच्या दरम्यान ही दुर्घटना घडली आहे. माडेकर यांच्या घरात हा स्फोट झाला असून, परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
खरं तर प्रियांजली अपार्टमेंटमध्ये राहणारं माडेकर कुटुंबीय काही कामानिमित्त बाहेरगावी गेले आहेत. त्याच्या घरातून सिलिंडरच्या गॅसचा वास येऊ लागला. त्यानंतर रात्री आठ वाजताच्या दरम्यान माडेकर यांना शेजाऱ्यांनी गॅसचा वास येत असल्याची कल्पना दिली. त्यानंतर माडेकर कुटुंबीयांनी कुबेर नावाच्या नातेवाईकाला घरी जाऊन पाहणी करण्यास सांगितलं. कुबेर यांनी घर उघडले असता सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटात चार जण जखमी झाले आहेत. जखमींची परिस्थिती गंभीर असल्याचंही सांगितलं जात आहे. त्यांना शाश्वत या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.