वारकऱ्यांच्या स्वयंपाकावेळी सिलेंडरने घेतला पेट ; अग्निशामक दलाकडून आग आटोक्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2019 15:32 IST2019-06-27T15:29:31+5:302019-06-27T15:32:19+5:30
शाळेत वारकरी मुक्कामास असताना स्वयंपाकावेळी एका गॅस सिलेंडरने अचानक पेट घेतला.

वारकऱ्यांच्या स्वयंपाकावेळी सिलेंडरने घेतला पेट ; अग्निशामक दलाकडून आग आटोक्यात
पुणे : संत ज्ञानेश्वर माऊली व संत तुकाराम महाराजांच्या पालखींचे बुधवारी सायंकाळी पुण्यनगरीत आगमन झाले. या पालखी सोहळ्यामुळे शहरातील संपूर्ण वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघाले.परंतु, आज (गुरुवार) दुपारी बाराच्या सुमारास ढोले पाटील गणपती मंदिरानजीक असणाऱ्या शाळेत वारकरी मुक्कामास असताना स्वयंपाकावेळी एका गॅस सिलेंडरने अचानक पेट घेतल्याने गोंधळ उडाला. पण अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला.
अग्निशमन दलास घटनेची माहिती मिळताच नायडू अग्निशामक केंद्राचे बंब घटनास्थळी दाखल तातडीने रवाना झाले.गॅस सिलेंडरने रेग्युलेटरच्या ठिकाणी पेट घेतल्याचे पाहताच आगीवर पाणी मारुन अग्निशामक दलाच्या जवानांनी काही वेळातच आग आटोक्यात आणली. अग्निशामक दलाने तत्परतेने आग विझवून अनर्थ टाळल्याने वारकऱ्यांनी जवानांचे आभार मानले. या कामगिरीमध्ये नायडू अग्निशामक केंद्राचे अधिकारी विजय भिलारे, वाहन चालक सतिश श्रीसुंदर, तांडेल विजय चौरे, जवान गणेश कुंभार, भालचंद्र गव्हाणकर व देवदूत जवान अमृत रुपनर, दिपक कोकरे, किशोर गाडे यांनी सहभाग घेतला.