ढोलवादनातून ‘ति’ने शोधला मुक्तीचा राजमार्ग

By admin | Published: July 6, 2017 03:50 AM2017-07-06T03:50:32+5:302017-07-06T03:50:32+5:30

नोकरी, घर आणि मुले हे सगळे पाहून ढोल-ताशा सरावासाठी रोजचे दोन तास देणे तशी अवघड गोष्ट. आपले रोजचे व्याप सांभाळून महिला, युवती

'D' discovered the highway of liberation | ढोलवादनातून ‘ति’ने शोधला मुक्तीचा राजमार्ग

ढोलवादनातून ‘ति’ने शोधला मुक्तीचा राजमार्ग

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : नोकरी, घर आणि मुले हे सगळे पाहून ढोल-ताशा सरावासाठी रोजचे दोन तास देणे तशी अवघड गोष्ट. आपले रोजचे व्याप सांभाळून महिला, युवती या ढोलपथकात हमखास वर्णी लावतात. त्यात ढोल किंवा ताशा कमरेला अडकवून तो सलग दोन-अडीच तास वाजवणे हे मुलींसाठी फारसे सोपे नाही. पण एकदा का ढोलवर टिपरी पडून त्याचा नाद घुमायला लागला, की बाकी आयुष्यातील सगळे व्याप, तणाव, मेहनत आदी गोष्टी मागे पडतात आणि उरतो फक्त तो मोरयाच्या जयघोषातला वाद्यांचा सुरेल नाद...! सुखाच्या नव्या स्वच्छंदी तालात स्वत:ला मुक्त व्यक्त करण्यासाठी तिला गवसला आहे ढोलपथकाचा एक नवा मार्ग...!
महिलांचा ढोलपथकातील वाढता सहभाग पाहता या उत्साहाच्या पडद्यामागचा शोध घेताना उलगडले मुलींच्या सहभागाचे काही मजेशीर प्रसंग... ढोलपथकांच्या प्रचलित महतीमुळे आई-वडिलांची परवानगी मिळणेही आजकाल अवघड
राहिलेले नाही.
ढोल वाजविण्यापेक्षा तो कमरेला व्यवस्थित बांधणे व सांभाळणे हे एक दिव्य असते. कारण तो जास्त घट्ट बांधला गेला तर वादकाला त्रास होतो. सैल बांधला गेला तर घसरून जातो. त्याच्यावर सतत आघात होत असतात. त्यामुळे त्याची पोझिशन सतत स्थिर आणि वादकाला सुखावह अशी राहणे महत्त्वाचे असते. अशी पोझिशन राखता येईल, अशा रीतीने ढोलताशा कसा बांधायचा, हे शिकण्यापासून सुरुवात होती. ढोलताशा हा वाजविण्यापूर्वी पाहणी करावी लागते. म्हणजेच त्याच्या दोन्ही पृष्ठभागांना आवश्यक तो ताण त्याचे स्क्रू अथवा नटबोल्ट पिळून ते योग्य रीतीने आवाज काढतील, अशा रीतीने अ‍ॅडजस्ट करावे लागतात. हे बारकावे शिकण्यापासून महिलांची सुरुवात होते. ढोल आणि ताशा वाजविणे हे अत्यंत ताकदीचे काम आहे. ढोल-ताशा उत्तम वाजविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या काड्या अथवा काठ्या यांच्यावरील पकड व त्यांचा आघात करण्याची शैली हेदेखील आत्मसात करण्याचे अवघड आव्हान या महिलांनी सहजपणे पेलले. ढोल उत्तम वाजविता येण्यासाठी वादकाला अ‍ॅक्शनही कराव्या लागतात.
ढोल-ताशावादनातून या नव्या आविष्कारामुळेच अवघ्या पाच वर्षांच्या काळात महिलांचे ढोल-ताशा पथक हे महाराष्ट्रातल्या कोणत्याही सांस्कृतिक सोहळ्याचे अविभाज्य अंग ठरले. आता त्याकडे नवी पिढी नवे करिअर म्हणून पाहू लागली आहे. अनेक शाळा आणि कॉलेजांमध्ये असे पथक तयार करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहेत व त्यांना भरघोस असा प्रतिसादही लाभतो आहे.

स्वतंत्र पथक
या सरावाच्या काळात तिच्या मनातले कित्येक व्याप, दडपण, नैराश्य, दु:ख आदी समस्यांवर दणक्यात आत्मविश्वासपूर्वक मात करते. केवळ हौस आणि नवीन काहीतरी करण्याची आवड याही भूमिकेतून दीड दशकापूर्वी या क्षेत्रात महिलांचा या पथकांत चंचुप्रवेश झाला होता. यापैकी काही युवती आणि महिलांनी या वादनामध्ये प्रावीण्य संपादन केले. त्यातूनच मग ढोलताशाचे स्वतंत्र पथक साकार करण्याची आगळीवेगळी कल्पना जन्माला आली. पुण्याच्या विमलाबाई गरवारे प्रशाला येथे त्याचा श्रीगणेशा झाला. नववर्षाच्या स्वागत यात्रा, दसऱ्याची शोभायात्रा अशा प्रसंगी महिलांचे ढोलपथक हे सर्वाधिक आकर्षण केंद्र ठरू लागले. त्यातूनच अशा पथकांची संख्या वाढत आहे.

इंजिनीअरिंग महाविद्यालयात कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षाला आहे. अभ्यास करून वेळ देते. सराव झाल्यानंतर रात्री जाऊन अभ्यास करते. दरवर्षी ढोल वाजवणे कंटाळवाणे वाटत नाही. या सर्व प्रक्रियेत केवळ नृत्य वा ढोल महत्त्वाचा नाही, तर त्यातून मिळणारा अनुभव, होणारे शिक्षण महत्त्वाचे आहे. या सगळ्या अनुभवातून या युवतींमध्ये नेतृत्वगुण विकसित होत असतात.
- ऋता भोरे

माझ्या मुलीला मी ताशाच्या सरावाला सोडण्यासाठी येत होते. त्यानंतर मीदेखील ढोल पथकामध्ये सामील झाले. ढोल पथकात आल्यानंतर वेळेचे काटेकोर नियोजन करणे, परिस्थिती हाताळण्याचा आत्मविश्वास, समूहात वागण्याचे शिक्षण, न थकता मेहनत करण्याची जिद्द येते. पथकात आल्यानंतर माझ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. मी फक्त गृहिणी न राहता माझे सर्व छंद जोपासण्यास मदत झाली. ढोलवादनामुळे माझ्या कौशल्याने असा काही जोश भरला, की आमच्या कानावर ढोल-ताशाचे वादन पडले, की आमचे शरीर आपोआप त्यावर ठेका धरते.
- श्रद्धा गोखले

झील स्थापत्य अभियांत्रिकी महाविद्यालयातून शिक्षण घेत आहे. ढोल व तोशा दोन्ही वाजविता येतो, पण मला ताशा वाजवायला खूप आवडते. संगीताच्या ओढीने मी पथकामध्ये सहभागी होऊन वाद्य वादनाकडे वळले. सिव्हिलचे शिक्षण घेत असल्यामुळे अभ्यास खूप करावा लागतो. पण वाद्यवादनामुळे दिवसभराचा शीण दूर होतो. खूप एनर्जी मिळते. नीट नियोजन करून अभ्यास व पथकाचा सराव केल्यामुळे त्रास होत नाही.
- काजल बोडरे

गेल्या तीन वर्षांपासून मी गजराज पथकामध्ये वादन करीत आहे. सुरुवातीला एकटी असलेल्या अंकिताने दोन-तीन मैत्रिणी वादनासाठी तयार केल्या. त्यानंतर आता सुमारे १०५ मुली या पथकात वादनासाठी तयार झाल्या आहेत. त्या म्हणाल्या,की आम्ही आता नवीन येणाऱ्या मुलांनाही शिकवतो. आम्ही नोकरी करून पथकात वादनाला येतो. सायंकाळी ६.३० ते ९ वाजेपर्यंत आमचा सराव चालू असतो.
- अंकिता शेंडगे

Web Title: 'D' discovered the highway of liberation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.