अत्रे पुरस्काराने आयुष्य धन्य झाले , दमांची कृतार्थ भावना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 02:19 AM2018-08-14T02:19:21+5:302018-08-14T02:19:31+5:30
मिडास राजा हात लावेल त्याचे जसे सोने व्हायचे. तसे आचार्य अत्रेंनी ज्या गोष्टीत हात घातला, त्याचे सोने झाले. ज्यांच्यावर मी मनापासून प्रेम केले त्या अत्रेंच्या नावाच्या पुरस्काराने माझे आयुष्य धन्य झाले
पुणे : मिडास राजा हात लावेल त्याचे जसे सोने व्हायचे. तसे आचार्य अत्रेंनी ज्या गोष्टीत हात घातला, त्याचे सोने झाले. ज्यांच्यावर मी मनापासून प्रेम केले त्या अत्रेंच्या नावाच्या पुरस्काराने माझे आयुष्य धन्य झाले, अशा शब्दातं ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांनी कृतार्थ भावना व्यक्त केली.
साहित्यसम्राट आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या जन्मदिनानिमित्त आत्रेय संस्थेतर्फे माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते मिरासदार यांना आचार्य अत्रे मानचिन्ह प्रदान करण्यात आले. परचुरे प्रकाशनातर्फे आचार्य अत्रे संपादित ‘नवयुग वाचनमाला’च्या नव्या आवृत्तीचे प्रकाशन या वेळी झाले. अत्रे यांच्या कन्या मीना देशपांडे, नातू अॅड. राजेंद्र पै, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे आणि प्रकाशक अप्पा परचुरे या प्रसंगी उपस्थित होते. उत्तरार्धात डॉ. गिरीश ओक यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘तो मी नव्हेच’ नाटकाचा प्रयोग झाला.
प्रतिभा पाटील म्हणाल्या, ‘‘१९६२मध्ये मी विधानसभेत पहिल्यांदा निवडून गेले तेव्हा अत्रे यांची अनेक घणाघाती अशी प्रभावी भाषणे मी ऐकली आहेत. ते शिक्षक, राजकारणी, साहित्यिक, विनोदकार होते. त्यांचे लेखन वाचण्याची संधी मला त्या काळात मिळाली होती. साहित्यिक हे शब्दप्रभू असतात. उत्तम निर्मितीची प्रतिभा त्यांच्याकडे असते. आपल्या वाङ्मयनिर्मितीद्वारे ते समाजाला मार्गदर्शन करतात. साहित्यिक समाजाची अनमोल ठेव आहेत.