डी. एस. कुलकर्णी यांना हलवले खासगी रुग्णालयात, पोलीस कोठडीचे न्यायालयीन कोठडीत रूपांतर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2018 06:17 PM2018-02-18T18:17:52+5:302018-02-18T18:29:39+5:30
बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी यांना अधिक उपचारासाठी ससून रुग्णालयातून दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात हलविले आहे. न्यायालयाने त्यांना ७ दिवसांची पोलीस कोठडी दिली होती. तिचे रुपांतर न्यायालयीन कोठडीत करण्यात आले आहे.
पुणे - बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी यांना अधिक उपचारासाठी ससून रुग्णालयातून दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात हलविले आहे. न्यायालयाने त्यांना ७ दिवसांची पोलीस कोठडी दिली होती. तिचे रुपांतर न्यायालयीन कोठडीत करण्यात आले आहे.
पोलीस कोठडीत असताना मध्यरात्री डी. एस. कुलकर्णी यांचा तोल जाऊन ते जखमी झाले होते. त्यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याबाबत कुलकर्णी यांचे वकिल अॅड. चिन्मय इनामदार यांनी सांगितले की, रविवारी दुपारी सुट्टीच्या न्यायालयात अर्ज करण्यात आला होता. डीएसके यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे़ सकाळी ते बेशुद्ध होते़ त्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा ससून रुग्णालयात मिळणे शक्य नाही. त्यांच्यावर नेहमी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार करण्यात येत असून तेथील डॉक्टरांना त्यांची औषधे व अन्य बाबींची माहिती आहे. त्यामुळे त्यांना तेथे उपचार करण्यासाठी हलविण्याची परवानगी द्यावी, असा अर्ज करण्यात आला़ तो न्यायालयाने मंजूर करुन त्यांना तातडीने दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात हलवावे, असा आदेश दिला.
या न्यायालयात पोलिसांच्या वतीने एक अर्ज करण्यात आला़ त्यात डीएसके यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असल्याने त्यांच्याकडे पोलीस तपास करु शकत नाही़ त्यामुळे त्यांना न्यायालयीन कोठडी द्यावी, अशी विनंती करण्यात आली होती़ न्यायालयाने हा अर्ज मंजूर करुन त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली.
बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी व त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांना न्यायालयाने शनिवारी पोलीस कोठडी सुनावल्यानंतर त्यांना शनिवारी रात्री दहा वाजता विश्रामबाग पोलीस कोठडीत ठेवण्यात आले़ त्यांना जेवण देण्यात आले़ परंतु, त्यांनी ते घेतले नाही़ रात्री साडेअकराच्या दरम्यान त्यांना चक्कर आल्याने ते खाली बसले़ त्याचे वय लक्षात घेऊन पोलिसांनी त्यांना तातडीने ससून रुग्णालयात हलविले.
याबाबत ससून रुग्णालयाचे अधीक्षक डॉ़ अजय तावरे यांनी सांगितले की, साधारण सव्वा बाराच्या सुमारास डी़ एस़ कुलकर्णी यांना ससून रुग्णालयात आणण्यात आले़ तेव्हा ते बेशुद्ध होते़ त्यांना तातडीने व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले़ त्यांचे सिटी स्कॅन, एनजीओग्राफी तसेच अन्य तपासण्या करण्यात आले़ त्याचे सर्व रिपोर्ट नॉर्मल आले आहेत़ आता त्यांचा व्हेंटिलेटर काढण्यात आला असून त्यांना कृत्रिम श्वासोश्वास देण्यात येत असून त्यांची प्रकृती स्थिर असून प्रकृतीत सुधारणा होत आहे़ त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत होते.
मंगळवारी मेडिकल बोर्ड तपासणी करणार
याबाबत पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी सांगितले की, डीएसके यांच्या प्रकृतीमुळे त्यांच्याकडे चौकशी करता येणार नसल्याने त्यांच्या पोलीस कोठडीचा हक्क राखून ठेवत न्यायालयीन कोठडी द्यावी, अशी मागणी केली़ ती न्यायालयाने मंजूर केली़ खासगी रुग्णालयात उपचार करण्यात यावा, या अर्जाला ससून रुग्णालयात सर्व सुविधा असल्याने पोलिसांनी त्याला विरोध केला़ न्यायालयाने परवानगी दिली़ मंगळवारी सकाळी ८ वाजता डॉक्टरांचे मेडिकल बोर्ड त्यांची तपासणी करतील़ त्यानंतर त्यांना डिसचार्ज द्यायचा की अन्य काय याविषयीचा अहवाल न्यायालयाला सादर करतील़ त्यांना डिसचार्ज दिल्यानंतर आम्ही पुन्हा पोलीस कोठडीची मागणी करणार आहोत़