वाघोलीत सराफी दुकानावर दरोडा
By admin | Published: May 3, 2017 02:00 AM2017-05-03T02:00:50+5:302017-05-03T02:00:50+5:30
सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने आलेल्या दोघांनी वाघोली येथील बाइफ रस्त्यालगत असणाऱ्या बगाडे ज्वेलर्स मध्ये बंदुकीचा
वाघोली : सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने आलेल्या दोघांनी वाघोली येथील बाइफ रस्त्यालगत असणाऱ्या बगाडे ज्वेलर्स मध्ये बंदुकीचा धाक दाखवून १७ तोळे सोने चोरून नेल्याची घटना मंगळवारी दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमाराम घडली. दुकानातील सेल्समन महिलेने सायरन वाजविल्याने दोघांनी हातात येईल तेवढे सोने घेत दुचाकीवरून पळ काढण्याचा प्रयत्न केला़ या दोघांना पकडण्याचा प्रयत्न केल्याने त्यांच्यातील एकाने बंदुकीतून गोळी झाडली. यामध्ये सेल्समनच्या मानेला गोळी लागल्याने गंभीर जखमी झाला आहे.
सिद्धेश निवृत्ती भुजबळ (वय २४, रा. तळेगाव ढमढेरे, पुणे) असे जखमी झालेल्या सेल्समनचे नाव आहे.
याबाबतीत मिळालेल्या माहितीनुसार, वाघोली येथील बाइफ रस्त्यालगत बगाडे ज्वेलर्स हे सोने, चांदी खरेदीचे दुकान आहे. मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास या दुकानामध्ये एक तरुण सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने आला होता. दुकानातील सेल्समनने त्याला सोन्याची चैन व अंगठी दाखविली. दहा मिनिटांनंतर आणखी एक तरुण तोंडाला रुमाल बांधून बगाडे ज्वेलर्समध्ये दाखल झाला. आपल्याकडील बंदूक काढून त्याने सेल्समन आणि दोन महिला ग्राहकांना धमकाविण्यास सुरुवात केली. पहिल्यापासून दुकानात उपस्थित असणाऱ्या तरुणाने देखील त्याच्याकडील बंदूक बाहेर काढून सेल्समनवर रोखली. हिंदी भाषेत संभाषण करणाऱ्या दोघांनी ‘मुझे खून खराबा पसंद नही सब चूप चाप बैठो’ अशी धमकी देवून बंदूक रोखली होती. चोरट्याकडील बंदूक पाहून सर्वच सेल्समन घाबरले होते. चोरटे दुकानातील सोने चोरून नेणार एवढ्यातच अनिता जगताप या सेल्समन महिलेने भेदरलेल्या अवस्थेमध्येच प्रसंगावधान राखून सायरन वाजविला. सायरनचा आवाज ऐकून दोन्ही चोरटे घाबरून सोन्याच्या अंगठ्या ठेवलेल्या ट्रेमधील मिळतील तेवढ्या अंगठ्या घेवून दुकानाच्या बाहेर आले. दुकानाच्या बाहेर असणाऱ्या दुचाकीवर दोघेही बसून जात असताना सेल्समन सिद्धेश भुजबळ याने दोघांना पकडण्याचा प्रयत्न केला होता. परंतु पकडण्याचा प्रयत्न होत असल्याने एकाने त्याच्याकडील बंदुकीतून सिद्धेश भुजबळच्या दिशेने एक गोळी झाडली व पुणे नगर महामार्गाच्या दिशेने पसार झाले.
मानेला गोळी लागल्याने भुजबळ हा गंभीर जखमी झाला होता तर याचवेळी दोघांना पकडण्यासाठी आलेले मॅनेजर शिवाजी आसवले गोळीबारातून बचावले. चोरटे पसार झाल्यानंतर घटनेबाबतची माहिती पोलिसांना कळवून भुजबळ यांना तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच लोणीकंद पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून जिल्ह्यामध्ये नाकाबंदी करण्यात आली होती.