वाघोलीत सराफी दुकानावर दरोडा

By admin | Published: May 3, 2017 03:02 AM2017-05-03T03:02:09+5:302017-05-03T03:02:09+5:30

सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने आलेल्या दोघांनी वाघोली येथील बाइफ रस्त्यालगत असणाऱ्या बगाडे ज्वेलर्समध्ये बंदुकीचा

Dacoity at the Wagholite Sarai store | वाघोलीत सराफी दुकानावर दरोडा

वाघोलीत सराफी दुकानावर दरोडा

Next

वाघोली : सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने आलेल्या दोघांनी वाघोली येथील बाइफ रस्त्यालगत असणाऱ्या बगाडे ज्वेलर्समध्ये बंदुकीचा धाक दाखवून १७ तोळे सोने चोरून नेल्याची घटना मंगळवारी दुपारी सव्वादोनच्या सुमाराम घडली. दुकानातील सेल्समन महिलेने सायरन वाजविल्याने दोघांनी हातात येईल तेवढे सोने घेत दुचाकीवरून पळ काढण्याचा प्रयत्न केला़ या दोघांना पकडण्याचा प्रयत्न केल्याने त्यांच्यातील एकाने बंदुकीतून गोळी झाडली. यामध्ये सेल्समनच्या मानेला गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे.
सिद्धेश निवृत्ती भुजबळ (वय २४, रा. तळेगाव ढमढेरे, पुणे) असे जखमी झालेल्या सेल्समनचे नाव आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वाघोली येथील बाइफ रस्त्यालगत बगाडे ज्वेलर्स दुकान आहे. मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास या दुकानामध्ये एक तरुण सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने आला. सेल्समनने त्याला सोन्याची चेन व अंगठी दाखविली. दहा मिनिटांनंतर आणखी एक तरुण तोंडाला रुमाल बांधून दुकानात दाखल झाला. बंदूक काढून त्याने सेल्समन आणि दोन महिला ग्राहकांना धमकाविण्यास सुरुवात केली. पहिल्यापासून दुकानात उपस्थित असणाऱ्या तरुणाने देखील त्याच्याकडील बंदूक बाहेर काढून सेल्समनवर रोखली. हिंदी भाषेत संभाषण करणाऱ्या दोघांनी ‘मुझे खून खराबा पसंद नही, सब चूप चाप बैठो’ अशी धमकी देऊन बंदूक रोखली होती. चोरट्याकडील बंदूक पाहून सर्वच सेल्समन घाबरले होते. चोरटे दुकानातील सोने चोरून नेणार एवढ्यातच अनिता जगताप या सेल्समन महिलेने प्रसंगावधान राखून सायरन वाजविला. सायरनचा आवाज ऐकून दोन्ही चोरटे घाबरून सोन्याच्या अंगठ्या ठेवलेल्या ट्रेमधील मिळतील तेवढ्या अंगठ्या घेऊन दुकानाच्या बाहेर आले. दुकानाच्या बाहेर असणाऱ्या दुचाकीवर दोघेही बसून जात असताना सेल्समन सिद्धेश भुजबळ याने दोघांना पकडण्याचा प्रयत्न केला होता. एकाने सिद्धेश भुजबळच्या दिशेने एक गोळी झाडली व पुणे नगर महामार्गाच्या दिशेने
पसार झाले.
मानेला गोळी लागल्याने भुजबळ गंभीर जखमी झाला होता तर याच वेळी दोघांना पकडण्यासाठी आलेले मॅनेजर शिवाजी आसवले गोळीबारातून बचावले. घटनेची माहिती मिळताच लोणीकंद पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्ह्यामध्ये नाकाबंदी करण्यात आली. श्वानपथक व ठसेतज्ज्ञांनी ठसे व गोळीचे नमुने घेतले.
दुकानातील सीसीटीव्ही फुटेज घेऊन स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक, लोणीकंद पोलिसांचे पथक चोरट्यांच्या शोधार्थ रवाना झाले आहे. जखमी सिद्धेश भुजबळ याच्यावर उपचार सुरू आहेत.

अनिता जगताप यांचे प्रसंगावधान

बगाडे ज्वेलर्सवर चोरी करण्यासाठी आलेल्या दोन तरुणांनी सेल्समनवर बंदूक रोखून चोरी करण्याचा प्रयत्न केला असता भेदरलेल्या अवस्थेत असणाऱ्या अनिता जगताप या सेल्समन महिलेने प्रसंगावधान साधून सायरन वाजविला.
सुरक्षारक्षक रजेवर
बगाडे ज्वेलर्स दुकानाच्या सुरक्षेसाठी एक सुरक्षा रक्षक नेहमी तैनात असतो, परंतु मागील ४ दिवसांपासून सुरक्षारक्षक लग्नानिमित्त सुट्टीवर असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. चार दिवसांपासून बदली सुरक्षारक्षकाची नेमणूक केली नसल्याने चोरट्यांनी याच संधीचा फायदा उचलला आहे. सुरक्षारक्षक असता तर चोरीची घटनाच घडली नसल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये होती.

Web Title: Dacoity at the Wagholite Sarai store

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.