मटका किंग बबलु नायरच्या अड्ड्यावर धाड, खडकीत ६३ जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 05:38 AM2019-07-29T05:38:21+5:302019-07-29T05:38:25+5:30
नोटा मोजण्यासाठी चक्क मशीन होते
पुणे : खडकीतील प्रसिद्ध मटका किंग बबलु नायर याच्या अड्ड्यावर पोलीस आयुक्त डॉ. के व्यंकटेशम यांच्या आदेशाने शनिवारी रात्री छापा टाकून तब्बल ६३ जणांना अटक करण्यात आली. एका ठिकाणी इतके लोक राजरोजपणे जमून जुगार खेळत असल्याचे पाहून कारवाईसाठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना आश्चर्य वाटले़ तेथे चक्क नोटा मोजण्यासाठी मशीनचा वापर केला जात असल्याचे आढळून आले़
पोलीस ठाण्यापासून काहीच अंतरावर खडकी रेल्वे स्टेशनच्या पाठीमागे राजरोजपणे मटका व्यवसाय सुरु होता. मटका किंग बबलु नायर याचा हा अड्डा असल्याने तो निर्वेधपणे सुरु होता़ या अड्ड्यावर एकावेळी शेकडो लोक कल्याण मटका लावण्यासाठी तेथे रांगा लावत असत़ त्याच ठिकाणी तीन पत्ती, रम्मीवर पैसे लावून खेळत असतात़ पोलिसांच्या नाकावर टिच्चून गेल्या काही वर्षांपासून हा अड्डा सुरु होता़ पोलीस आयुक्त डॉ़ के़ व्यंकटेशम यांना याची माहिती मिळाली़ त्यांनी परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांना यावर कारवाई करण्याचे आदेश दिले़ त्यांनी आपल्याकडील कर्मचारी व फरासखाना पोलीस ठाण्यातील काही अधिकारी, कर्मचारी यांना घेऊन शनिवारी सायंकाळी या अड्ड्यावर छापा घातला़ तेव्हा तेथे कल्याण ओपन मटका, तीन पत्ती, रम्मी असे जुगार खेळत असलेले लोक आढळून आले़ नासीर माहिद्दीन कुरेशी, संदीप शिवाजी आठवले, बिलाल उस्मान शेख, ताहीर मोहम्मद अली अन्सारी, हेमंत रामदास लोंढे, अकबर सरवर बागवान, हर्षद अरुण कांबळे, निलेश निवृत्ती चव्हाण, राहुल पवनकुमार लालवानी, अनिकेत बाळासाहेब इंगवले (सर्व रा़ खडकी) यांच्यासह ६३ जणांना पोलिसांनी अटक केली. त्यांची झडती घेतली असताना त्यांच्याकडे २ लाख २९ हजार १३ रुपयांची रोकड, जुगाराचे साहित्य, ४५ मोबाईल, इलेक्ट्रॉनिक नोटा मोजण्याचे मशीन असे २ लाख ७७ हजार ५१३ रुपयांचा माल जप्त करण्यात आला़ या जुगार अड्ड्याचा मालक बबलु सबस्टीन नायर (रा़ खडकी) असून त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, पोलीस उपनिरीक्षक वाय पी़ सूर्यवंशी, हवालदार सचिन इनामदार, पोलीस नाईक जगदाळे, पालवे, शिपाई गायकवाड, साळुंके, अनिल गायकवाड, देशमुख, भोकरे यांनी या कारवाई भाग घेतला होता.
कॅम्प भागातही कारवाई
लष्कर भागातील भीमपुरा परिसरात जुगारअड्डयावर गुन्हे शाखेने छापा टाकला. पोलीस निरीक्षक गजानन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी जुगार अड्डयाचा चालक राजू जनार्दन श्रीगिरी (वय ५०, रा.भीमपुरा, लष्कर) याच्यासह १५ जणांना अटक करण्यात आली.