दादा, तुमच्यापर्यंत कार्यकर्त्यांना पुण्यातील नेते मंडळी पोहोचून देत नाही; माधुरी मिसाळ यांची खंत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2022 10:50 AM2022-10-07T10:50:40+5:302022-10-07T10:50:40+5:30
सच्चा कार्यकर्ता मागे राहत असून, त्याला न्याय द्या, अशी मागणी
पुणे : भाजपचे सरकार आले आहे. आता विविध महामंडळांवर आपल्या कार्यकर्त्यांना न्याय द्या, अशी मागणी करीत भाजपच्या पर्वती मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी, तुमच्यापर्यंत कार्यकर्त्यांना शहरातील नेते मंडळी पोहोचूच देत नाहीत, अशी खंत व्यक्त केली. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते यांच्या सत्कार समारंभातच मिसाळ यांनी व्यक्त केलेल्या या मताचे समर्थन उपस्थित कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात केले. टिळक स्मारक मंदिर येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात मिसाळ यांचे भाषण कार्यकर्त्यांना अधिक भावले. नेते मंडळी कार्यकर्ता मोठा झाला तर आपल्याला नुकसान होईल म्हणून, त्याला तुमच्यापर्यंत पोहोचूच देत नाहीत. त्यामुळे सच्चा कार्यकर्ता मागे राहत असून, त्याला न्याय द्या, अशी मागणी मिसाळ यांनी यावेळी केली.
“छोटे मन से कोई बडा नही होता
तुटे मन से कोई खडा नही होता”
हा शेर ऐकवित त्यांनी यावेळी शहरातील पदाधिकाऱ्यांना सुनावले. तर भाजप सरकार नसताना आपले सरकार येईल की नाही या भीतीने जे कुंपणावर होते केवळ मलिदा पाहत होते, त्यांनाही यापुढे लक्षात ठेवा व आगामी निवडणुकीत निष्ठावंतांना न्याय द्या, अशी मागणी केली. त्यांच्या या मागणीचे उपस्थितांनी मोठ्या घोषणा देत स्वागत केले.
फटाके वाजविले तर मी परत जाईन
‘पुणे शहर - स्वच्छ शहर सुरक्षित शहर’ हा माझा संकल्प आहे. तरीही माझ्या निवडीच्या अभिनंदनाचे फ्लेक्स शहरभर लावले गेले. शहर विद्रूपीकरणात अशाच अनधिकृत फ्लेक्सचा मोठा हातभार असतो. तुम्हाला एवढीच हौस असेल तर अधिकृत बोर्ड भाड्याने घेऊन तेथे दहाऐवजी दोनच फ्लेक्स लावा, असे परखड मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. तसेच माझ्या कार्यक्रमात यापुढे फटाके वाजविले तर मी गाडीतून न उतरताच परत जाईन, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.