मुलीच्या प्रेमासाठी वडील झाले लग्नखर्च द्यायला तयार
By admin | Published: April 12, 2015 12:34 AM2015-04-12T00:34:43+5:302015-04-12T00:34:43+5:30
तिचा अन् त्याचा संसार १६ वर्षांपूर्वीच तुटला होता. दोन मुली पदरात होत्या. न्यायालयाने तिला व तिच्या दोन चिमुरडींसाठी पतीकडून पोटगी देण्यास सुरुवात केली...
पुणे : तिचा अन् त्याचा संसार १६ वर्षांपूर्वीच तुटला होता. दोन मुली पदरात होत्या. न्यायालयाने तिला व तिच्या दोन चिमुरडींसाठी पतीकडून पोटगी देण्यास सुरुवात केली... तिने कर्ज काढून मुलीचे लग्न लावले खरे... मात्र कर्जाचा डोंगर पेलणे अशक्य असल्याचे पाहून मुलीच्या लग्नाचा खर्च मिळावा म्हणून त्याच्याकडूनही लग्नाचा खर्च मिळावा म्हणून तिने न्यायालयात दावा दाखल केला... आपल्या दोघांमधील भांडण बाजूला राहू दे, मुलीच्या प्रेमाखातर तिच्या लग्नाचा खर्च देण्याची पित्याने तयारी दाखवली... त्याने लग्नखर्च म्हणून सव्वादोन लाख रुपये दिले. इतकेच नव्हे तर तिच्या डोहाळजेवणाच्या खर्चासाठीही तो स्वखुशीने राजी झाला.
अक्षय आणि सुनीता (नावे बदललेली) हे दोघे १६ वर्षांपासून विभक्त राहात आहेत. त्यांना दोन मुली असून, त्या सुनीताकडे असतात. सुनीताचा उदरनिर्वाहाचा अन्य काही मार्ग नाही. ती तिच्या माहेरी आपल्या मुलींसह राहता होती. त्यामुळे न्यायालयाकडून तिला पोटगी मिळत असे व त्यावर त्या तिघींची गुजराण होत असे. मात्र दरम्यानच्या काळात मोठ्या मुलीचे लग्न झाले. या लग्नासाठी सुनीताने कर्जपाणी घेतले होते. दुसऱ्या मुलीचे शिक्षण सुरू आहे. तिचे शिक्षण आणि हे कर्ज भागविणे तिला अवघड होऊ लागल्याने मुलीच्या लग्नाचा खर्च पतीकडून मिळावा म्हणून सुनीताने कौटुंबिक न्यायालयात अर्ज दाखल केला होता. हा खटला चालण्यास व खर्च मिळण्यास तिला कित्येक वर्षे गेले असते; मात्र हा खटला राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ठेवण्यात आला.
माजी न्यायाधीश वि. वि. शहापूरकर, समुपदेशक राजेंद्र ततार, अॅड. हेमा सुपेकर यांच्या पॅनेलपुढे हा खटला ठेवण्यात आला. त्यांच्या समुपदेशनाने अक्षयने तातडीने मुलीच्या लग्नाचा खर्च देण्याची तयारी केली. २ लाख २५ हजार रुपये ५ हप्त्यांमध्ये देण्यास तो तयार झाला. लग्नाच्या खर्चाबरोबरच मुलीच्या डोहाळजेवणाचा खर्चही करण्याची इच्छा त्याने व्यक्त केली. तसेच दुसऱ्या मुलीच्या शिक्षणाचीही जबाबदारी त्याने घेतली. (प्रतिनिधी)
४पती-पत्नीच्या भांडणामध्ये मुलांवर परिणाम होतो. मुलींच्या बाबतीत तर अनेकदा पक्षपात होतो. त्यांच्याकडे दुर्लक्ष होते. मात्र या खटल्यात पित्याने स्वत:हून मुलींची जबाबदारी घेत असल्याचे सांगून रक्कम देण्याची तयारी दर्शविली. लोकअदालतमध्ये दोन्ही पक्षकार समोरासमोर असल्यामुळे व त्यांच्यामध्ये चर्चा घडवून आणल्यामुळे वाद मिटविण्यास मदत होते, असे समुपदेशक राजेंद्र ततार यांनी सांगितले.