दोघींचा दादला, तिसरीशी संगनमत करून दुसरीचे अश्लील फोटो केले व्हायरल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:13 AM2021-03-08T04:13:00+5:302021-03-08T04:13:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : एकीशी सुरुवातीला लग्न केले. त्यानंतर तिच्या आजारपणाचे कारण सांगून दुसरीशी आळंदीत विवाह केला. दोघींशी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : एकीशी सुरुवातीला लग्न केले. त्यानंतर तिच्या आजारपणाचे कारण सांगून दुसरीशी आळंदीत विवाह केला. दोघींशी संसार करत असताना त्याने दत्तक मुली घेण्याचा बहाणा करून तिसऱ्या तरुणीला गावाकडे ठेवले. दोघींना सोडून आता तो तिसरीबरोबर संसार करू लागला. तिसरीच्या संगनमताने दुसरीचे अश्लील फोटो व मजकूर फेसबुकवर व्हायरल केले. त्यांनी ज्यांना हे फोटो पाठविले, त्यांनी आणखी दुसऱ्यांना ते पाठवून महिलेची बदनामी केली. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी त्यांच्या पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी उंड्रीत राहणाऱ्या २९ वर्षांच्या महिलेने कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : फिर्यादीचा पती हा बांधकाम व्यावसायिक आहे. त्याचे पहिले लग्न झाले होते. पहिल्या पत्नीला हृदयविकार असल्याचे सांगून त्याने फिर्यादीशी आळंदी येथे २००८ मध्ये विवाह केला. ते तिघे एकत्र राहात होते. फिर्यादीला दोन मुले आहेत. त्याने आपण एका मुलीला दत्तक घेऊ म्हणजे आपल्याला कन्यादानाचे पुण्य मिळेल, असे पहिल्या पत्नीला समजावले. तिची समजून काढून त्याने एका २२ वर्षांच्या तरुणीला उस्मानाबाद येथील गावाकडे फिर्यादीच्या सासूबरोबर ठेवले. त्यानंतर तो कायम गावाकडे राहू लागला. या दोघींना वाऱ्यावर सोडले. दत्तक घेतलेल्या तरुणीबरोबर त्याने अनैतिक संबंध ठेवल्याचा फिर्यादीला संशय आहे. त्यामुळे फिर्यादीच्या सवतीने उस्मानाबाद येथे कौटुंबिक हिसांचाराचा गुन्हा दाखल केला. तसेच फिर्यादीने पुण्यात कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी न्यायालयात दावा दाखल केला असून तो अजून प्रलंबित आहे. या दाव्यामध्ये न्यायालयाने फिर्यादीच्या पतीला फिर्यादीची बदनामी करू नये, असे आदेश दिले होते. या खटल्यामुळे रागावलेल्या पतीने त्याच्याकडे असलेले फिर्यादीचे अश्लील फोटो व मजूकर त्याने फेसबुक मेसेंजरमार्फत किशोर कदम आणि समीर शेख (दोघे रा. उस्मानाबाद) यांच्या माेबाईलवर पाठविले. त्यांनी हे फोटो इतरांना पाठवून फिर्यादी यांची बदनामी केली. फिर्यादीच्या पतीने बबूल नावाच्या व्यक्तीच्या मोबाईलवरून व्हॉटसअपद्वारे फिर्यादींच्या व्हॉटसअपवर धमक्यांचे मेसेज केले, असे फिर्यादीत म्हटले आहे. या धमक्यांच्या त्रासाला कंटाळून फिर्यादी यांनी कोंढवा पोलिसांकडे धाव घेतली.
पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेत आहे.