ललित पाटील प्रकरणी दाेन डाॅक्टर कारागृहात; ‘ससून’चे देवकाते, कारागृहाचे मर्साळेवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2023 10:29 AM2023-12-08T10:29:25+5:302023-12-08T10:29:44+5:30
डाॅ. प्रवीण दादासाहेब देवकाते (वय ४०) आणि डाॅ. संजय मर्साळे या दोघांना अटक केली होती.....
पुणे : ड्रग तस्कर ललित पाटील प्रकरणात ससून येथील वैद्यकीय अधिकारी डाॅ. प्रवीण दादासाहेब देवकाते आणि येरवडा कारागृहाचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. संजय मर्साळे या दोघांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.
डाॅ. प्रवीण दादासाहेब देवकाते (वय ४०) आणि डाॅ. संजय मर्साळे या दोघांना अटक केली होती. गुरुवारी (दि.७) त्यांची पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. पाेलिसांनी या दोघांना न्यायालयीन काेठडी देण्याची मागणी केली असता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. सी. बिराजदार यांच्या न्यायालयाने ती मान्य केली.
डाॅ. प्रवीण देवकाते हा अस्थिराेगतज्ज्ञ असून, ससून रुग्णालयातील वाॅर्ड क्रमांक १६ ची जबाबदारी त्याच्यावर हाेती. ललित पाटील याला ऑर्थाेपेडिक्स संदर्भात काेणताही आजार नसताना, त्याने दाेन ते तीन महिने त्याचा मुक्काम ससून रुग्णालयात वाढविला. पाटील याचा भाऊ भूषण पाटील व मित्र अभिषेक बलकवडे यांच्या संपर्कातदेखील तो असल्याचे पाेलिस चाैकशीत निष्पन्न झाले. त्याचप्रमाणे ससून रुग्णालयातील एका मध्यस्थाच्या फाेनवरून डाॅ. देवकाते याने पाटील याच्या नातेवाइकांशी वारंवार संपर्क केल्याचा पुरावा पाेलिसांना मिळून आला आहे.
येरवडा कारागृहातील डाॅ. संजय मर्साळे याने ललित पाटील हा आजारी असल्याचे सांगून त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यासाठी शिफारस पत्र दिल्याचे आणि पाटील याचा भाऊ भूषण पाटील व मित्र अभिषेक बलकवडे यांच्या संपर्कात असल्याचे दिसून आले आहे.