दगडूशेठ गणपतीचा ऐतिहासिक निर्णय! विसर्जन मिरवणुकीत मानाच्या गणपतीपाठोपाठ होणार मार्गस्थ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 12:20 PM2023-08-23T12:20:41+5:302023-08-23T12:24:28+5:30
गतवर्षी उशीर यंदा दगडूशेठ गणपती दुपारीच होणार विसर्जन मिरवणुकीत सहभागी
पुणे : मागील अनेक वर्षे दगडूशेठ गणपती बाप्पा विसर्जन मिरवणूक परंपरेप्रमाणे रात्री लक्ष्मी रस्त्यावर पोलिस प्रशासनाने मार्ग उपलब्ध करून दिल्यावर सहभागी होत आले आहेत. परंतु दरवर्षी निघायला होणारा उशीर खूपच वाढत चालला आहे. यामुळे यंदाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी मंडळाने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
मागील वर्षी सकाळी ७.४५ वाजता बेलबाग चौकात बाप्पांचे आगमन झाले. भाविकांना बाप्पांच्या दर्शनासाठी खूप ताटकळत रहावे लागले होते. भाविकांच्या भावनांचा विचार करून तसेच ज्या वेळेत गणेश मंडळे मिरवणुकीत सहभागी व्हायला फारशी उत्सुक नसतात, अशावेळी दुपारी ४ च्या दरम्यान श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा विसर्जन मिरवणुकीत लक्ष्मी रस्त्याने सहभागी होईल, अशी माहिती अध्यक्ष माणिकदादा चव्हाण यांनी दिली.
मानाचा पहिला कसबा गणपती 10.30 वाजता सुरू होतो. त्यानंतर इतर मानाचे गणपती मार्गस्थ होतात. 3 ते 4 नंतर 5 ही गणपती मार्गस्थ होतात. त्यानंतर बेलबाग चौक रिकामा होतो. त्यावेळी आम्ही मिरवणूक सुरू करणार आहोत. दुपारच्या वेळेत अंतर पडणार नाही याची आम्ही काळजी घेऊन हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्यामुळे लक्ष्मी रस्त्यावरील इतर मंडळांना विसर्जनाला उशीर होणार नाही.
- हेमंत रासने