पद मिळवण्याच्या हव्यासातूनच "दगडूशेठचे" अध्यक्षपद 8 महिन्यांपासून रिक्त
By राजू इनामदार | Published: August 3, 2022 11:59 AM2022-08-03T11:59:42+5:302022-08-03T12:00:18+5:30
विश्वस्त असलेल्या बहुतेकांना अध्यक्षपद हवे असल्यानेच ते रिक्त ठेवण्यात आले असल्याची चर्चा
पुणे : शहरातील प्रतिष्ठेच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्षपद मागील ८ महिन्यांपासून रिक्त आहे. सध्या विश्वस्त असलेल्या बहुतेकांना अध्यक्षपद हवे असल्यानेच ते रिक्त ठेवण्यात आले असल्याची चर्चा अन्य गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. सार्वजिनक मंडळाच्या कायदेशीर नोंदणी, ताळेबंद वगैरे गोष्टींची जबाबदारी असणाऱ्या धर्मादाय आयुक्त कार्यालयानेही याची दखल घेतलेली नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
एकाच विषयावर अनेक संघटना असतात, त्यांची एक शिखर संघटना असते, त्याप्रमाणेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट शहरातीलच नव्हे तर राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे शिखर मंडळ आहे. गेली अनेक वर्षे ट्रस्टच्या माध्यमातून गणेशोत्सवाला चांगली दिशा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. ट्रस्टचे दिवंगत अध्यक्ष प्रतापराव गोडसे त्यात अग्रभागी होते. ट्रस्ट तयार होण्याच्या आधी पंच मंडळ होते. त्यात प्रतापरावांचे वडिल होते. त्यांच्या निधनानंतर अशोकराव गोडसे यांना अध्यक्ष करण्यात आले. ६ डिसेंबर २०२१ मध्ये त्यांचे निधन झाले. त्यानंतर मागील ८ महिन्यांपासून ट्रस्टचे अध्यक्षपद रिक्तच आहे.
ट्रस्टचा व्याप बराच मोठा आहे. ससूनमधील रुग्णांना दररोज भोजन देण्यापासून ते मंदिरातील रोजची पूजा, सार्वजनिक सांस्कृतिक कार्यक्रम असे बरेच काही ट्रस्टच्या माध्यमातून सुरू आहे. यातील एकही काम थांबलेले नाही, मात्र ते अध्यक्षांविनाच सुरू आहे याबाबत शहरातील सार्वजनिक उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे. ट्रस्टला शहराच्या सार्वजनिक जीवनात मान सन्मान आहे. त्यामुळे सध्या विश्वस्त असलेल्यांपैकी अनेकांना अध्यक्षपद हवे आहे. त्यातूनच एकमत होत नसल्याने हे पद रिक्त ठेवले गेले असल्याची चर्चा आहे. मात्र त्यामुळेच तो चर्चेचा विषय झाला आहे.
कोणत्याही सार्वजनिक संस्थेची कायद्यानुसार धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे कायदेशीर नोंदणी करावी लागते. त्यात संस्थेच्या घटनेसह, पदाधिकारी, कामाचे स्वरूप, आर्थिक स्रोत, त्याचा वार्षिक ताळेबंद आयुक्त कार्यालयाकडे सादर करून त्याचे प्रमाणपत्र दरवर्षी घ्यावे लागते. काही चुकीच्या गोष्टी होत असतील तर कार्यालयाकडून त्याची दखल घेतली जाते. या ट्रस्टला अध्यक्ष नसल्याची मात्र अद्याप आयुक्त कार्यालयाने दखल घेतली नसल्याचे समजते. त्यांच्याकडून अद्याप कसलीही विचारणा झालेली नसल्याची माहिती मिळाली.
सध्या ११ जणांचे विश्वस्त मंडळ आहे. त्यात वयाने, अनुभवाने वरिष्ठ असलेले, तसेच राजकीय पक्षांशी संबधित, काही पदांवर असलेलेही आहेत. ट्रस्टच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रात पुढचे पाऊल टाकणे शक्य असल्याने अशा विश्वस्तांना अध्यक्षपद हवेच आहे. त्यातच अशोक गोडसे यांचे चिरंजीव अक्षय गोडसे यांनीही या पदावर जाहीरपणे दावा केला आहे. पणजोबांपासून असलेली परंपरा कायम ठेवा, ती मोडू नका अशी त्यांची मागणी आहे.
काही विश्वस्तांबरोबर संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, यंदाचा गणेशोत्सव दोन वर्षांच्या खंडानंतर साजरा होणार आहे. अशोक गोडसे यांनी या उत्सवाची सर्व प्राथमिक तयारी करून ठेवली होती. त्यामुळेच ते हयात नसले तरीही हा उत्सव त्यांच्याच अध्यक्षतेखाली, त्यांना श्रद्धांजली म्हणून त्यांच्याच नावे साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गणेशोत्सव संपल्यानंतर अध्यक्षपदाबाबत एकमताने निर्णय घेतला जाईल.