पुण्यातील दगडूशेठ गणपती ट्रस्टचा मोठा निर्णय, 127 वर्षांची परंपरा खंडीत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 12:25 PM2020-08-10T12:25:03+5:302020-08-10T12:25:32+5:30
गणेशभक्त व नागरिकांच्या आरोग्यहिताच्या दृष्टीने निर्णय
पुणे : पुण्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला होणारी गर्दी पाहता यंदा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा उत्सव मुख्य मंदिरात होणार आहे. दरवर्षी उत्सवाची पारंपरिक जागा असलेल्या कोतवाल चावडी येथे दगडूशेठ गणपती विराजमान होतो. मात्र, गेल्या १२७ वर्षात यंदा प्रथमच ही परंपरा खंडित होणार आहे. समाजहित लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी महापौर मुरलीधर मोहोळ, उत्सवप्रमुख हेमंत रासने, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
अशोक गोडसे म्हणाले, दरवर्षी दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी लाखो भाविक महाराष्ट्र आणि बाहेरील राज्यातून येतात. देशविदेशातील भाविक देखील आवर्जून दर्शनाला येतात. परंतु हा दिमाखात साजरा होणारा उत्सव यंदा कोरोनामुळे साधेपणाने आणि सरकारचे नियम पाळून केला जाणार आहे. आम्ही हा निर्णय चर्चेतून घेतला आहे. काही गणेश मंडळे मंदिरात उत्सव साजरा करायला तयार आहेत. पण, काहींना अडचणी आहेत. त्यावर प्रशासनाने तोडगा काढावा. गणपती मंडळांच्या अडचणी समजून घ्याव्यात. उत्सव मंदिरात करत असल्यामुळे गर्दी होणार नाही. आम्ही प्रशासनाला सहकार्य करू. हा ऐतिहासिक निर्णय प्रत्येक मंडळाने घ्यावा.
........
गणेश मंडळांनी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन पोलिसांमार्फत केले होते. त्याविषयी चर्चाही झाली. ती गणेश मंडळांनी मान्य केली आहे. सध्याची परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे वेगळे पाऊल उचलावे लागेल. आम्ही चांगुलपणाची स्पर्धा मंडळाबरोबर करणार आहोत. ही चळवळ व्हावी असा आमचा उद्देश आहे. इतर गणेश मंडळांना विश्वासात घेऊन चर्चा केली जाईल. आमचे प्रयोजन समजावून सांगितले जाईल. गर्दी नियंत्रणात ठेवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू...काही कटू निर्णय घ्यावे लागतील. पण नागरिक सहकार्य करतील असा विश्वास आहे डॉ राजेंद्र शिसवे, सहआयुक्त
---------
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने यावर्षी गणेशोत्सवात आरोग्यविषयक जनजागृती व आरोग्यसेवा देण्यात येईल. मंदिरामध्ये प्रवेश न करता बाहेरुनच गणरायाचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे. उत्सवाचे मुख्य आकर्षक असलेले सामुहिक महिला अथर्वशीर्ष पठण, शालेय विद्यार्थी अथर्वशीर्ष पठण यांसह इतर कार्यक्रम देखील रद्द केले आहेत. उत्सवकाळात अभिषेक, पूजा, आरती, गणेशयाग असे सर्व धार्मिक विधी मंदिरामध्ये गुरुजींद्वारे केले जाणार आहेत. भक्तांतर्फे स्वहस्ते होणारा अभिषेक देखील रद्द करण्यात आला आहे. याशिवाय सुरक्षेच्या दृष्टीने 60 सीसीटीव्ही कमेरे लावण्यात येणार आहेत. गणेशोत्सवात ऑनलाईन दर्शन सुविधा आणि ऑनलाईन कार्यक्रमांवर भर दिला जाणार आहे.
--------------
ज्यांची मंदिरे नाहीत अशा लहान मंडळांनी छोट्या स्वरूपात उत्सव साजरा करावा. कोणाला अडचण येणार नाही, असा मांङव टाकावा- मुरलीधर मोहोळ, महापौर