राज्य सरकारकडून पात्र उमेदवारांच्या पाठीत खंजीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:14 AM2021-08-13T04:14:52+5:302021-08-13T04:14:52+5:30
अमोल अवचिते पुणे : सहसंचालक, लेखा व कोषागार या पदांसाठी विभागानुसार ९३२ रिक्त पदांसाठी ९ जानेवारी २०१९ रोजी जाहिरात ...
अमोल अवचिते
पुणे : सहसंचालक, लेखा व कोषागार या पदांसाठी विभागानुसार ९३२ रिक्त पदांसाठी ९ जानेवारी २०१९ रोजी जाहिरात प्रसिद्ध करून फेब्रुवारी-मार्चमध्ये परीक्षा घेण्यात आली. तिसऱ्या निवड यादीच्या उमेदवारांनी नियुक्तीची मागणी केली असता, निवड प्रक्रियेचा एक वर्षाचा कालावधी संपुष्टात आला असून, २०१९ ची भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे, अशा आशयाचे पत्र उमेदवारांना पाठवले आहे. त्यामुळे सरकारने विश्वासघात केला असून, आमच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याची संतापजनक प्रतिक्रिया उमेदवारांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.
या जुलै २०१९ मध्ये निकाल प्रसिद्ध करण्यात आला. त्यानुसार पहिली, दुसरी आणि तिसरी अशा स्वरूपात निवड याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. तिसरी यादी कोरोनाच्या पहिल्या लाटेत अडकली. त्यामुळे ‘लॉकडाऊन’नंतरच प्रक्रिया राबविली जाईल, असे सांगण्यात आले. या परीक्षेची तिसरी निवड यादी जानेवारी ते मार्च २०२० या दरम्यान प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर कागद पडताळणी प्रक्रिया सुरू होती. ‘लॉकडाऊन’मुळे काही उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी होऊ शकली नाही. ‘लॉकडाऊन’ संपताच पूर्ण करून नियुक्ती दिली जाईल, असे विभागाकडून पात्र उमेदवारांना सांगण्यात आले. मात्र, तात्पुरत्या स्वरूपाची विचाराधीन असलेली तिसरी निवड यादी सामान्य प्रशासनाच्या नियमावलीनुसार परीक्षा प्रक्रियेचा एका वर्षाचा कालावधी संपल्याने भरती प्रक्रिया संपुष्टात आली आहे, असे उमेदवारांना पत्राद्वारे सांगण्यात आले.
त्यामुळे ९३२ पैकी सुमारे १३२ हून अधिक उमेदवारांना नोकरीपासून वंचित राहावे लागणार आहे. परीक्षेचा अभ्यास करून पात्र होऊनही कोणतीही चुकी नसताना तसेच सरकारच्या हातात असतानाही मिळाले पद गमवावे लागल्याने उमेदवारांच्या आनंदावर विरजण पडले आहे, अशी खंत उमेदवारांनी व्यक्त केली.
-----------
“पाच महिन्यांत आम्हाला नियुक्तीपत्र का देण्यात आलीे नाही? सरकार व संबंधित विभागाकडून अत्यंत असंवेदनशीलपणे आम्हाला कोणतीही चूक नसताना प्रक्रियेतून बाहेर काढण्यात आले. विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्यावरच सरकारला जाग येते का?”
-तृप्ती निकम
---------
परीक्षा होऊन अडीच वर्ष झाले. सामान्य प्रशासन विभागाकडून कार्यकाळ वाढवून घेता येतो. पण या अकार्यक्षम विभागाने हे केलं नाही. हे असच चालू राहील तर विद्यार्थी नक्षलवादाकडे वळायला वेळ लागणार नाही..
- ज्ञानेश्वर मडके