संततधार पावसात दहीहंडीचा जल्लोष
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 11:03 PM2024-08-27T23:03:47+5:302024-08-27T23:03:54+5:30
यंदा प्रथमच ३१ मंडळांनी एकत्र येऊन लाल महल चौकामध्ये संयुक्त दहीहंडी आयोजित केली.
पुणे : ‘मच गया शोर सारी नगरी रे’, ‘मोरया मोरया’ आदी गीतांवर थिरकत... छातीत धडकी भरेल असा दणदणाट करत, संततधार पावसाच्या सरीवर सरी झेलत... गोविंदांनी मोठ्या उत्साहात दहीहंडीचा उत्सव साजरा केला. शहर, उपनगरांतील दहीहंडी उत्सवात लाखो रूपयांच्या बक्षिसांची लयलूट करण्यात आली. ढोल-ताशाच्या दणदणाटात मंगळवारी (दि. २७) दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा झाला.
यंदा प्रथमच ३१ मंडळांनी एकत्र येऊन लाल महल चौकामध्ये संयुक्त दहीहंडी आयोजित केली. ते यंदाचे विशेष आकर्षण ठरले, तर श्रीमंत दगडूशेठ गणपती मंडळाची दहीहंडी पाहण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली. दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्यात दहीहंडीची तयारी दिमाखात केली होती. शहर आणि उपनगरात विविध ठिकाणी उंचच उंच दहीहंडी बांधण्यात आल्या होत्या. उंच दहीहंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चुरस पाहायला मिळाली.
दरम्यान, दहीहंडीनिमित्त शहराच्या मध्य भागात वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले होते. सायंकाळनंतर छत्रपती शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्त्यावरील वाहतूक वळविण्यात आली होती. छत्रपती शिवाजी रस्ता, महात्मा फुले मंडई, हुतात्मा बाबू गेणू चौक, आप्पा बळवंत चौक, टिळक रस्त्यावरील साहित्य परिषद चौक, नवी पेठेत सायंकाळनंतर मोठी गर्दी पाहायला मिळाली.
दहीहंडीचा जल्लोष
सुवर्णयुग तरुण मंडळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट आणि गुरुजी तालीम मंडळ, अखिल मंडई मंडळ, हुतात्मा बाबू गेनू मंडळ या मंडळांच्या दहीहंडीचा जल्लोष अनुभवण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली हाेती. दहीहंडी फोडणाऱ्या संघांना मोठ्या रकमेची पारितोषिके जाहीर करण्यात आली होती.
विविध रस्ते बंद
पाण्याचे फवारे अंगावर घेऊन बेधुंद होऊन नाचण्यासाठी गोपाळभक्तांसह गोविंदांनी शहराच्या मध्यवर्ती भागात दहीहंडी मंडळांपुढे मोठी गर्दी केली होती. दहीहंडी सोहळा आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने पुणे पोलिस आणि वाहतूक विभागाकडून प्रमुख रस्त्यांसह काही अंतर्गत रस्ते वाहतुकीसाठी बंद केले होते. त्यामुळे नदीपात्र किंवा जिथे जागा मिळेल त्या ठिकाणी वाहने लावून गोविंदा दहीहंडीचा आनंद घेत होते.
...अन् तरुणाई थिरकली
दाक्षिणात्य चित्रपटांतील गाणे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. यंदाच्या इल्लूमिनाथी हे गाणे दहीहंडीत आकर्षणाचा विषय ठरले. यासह गोविंदा आला रे, आला.., चांदी की डाल पर, मच गया शोर..., सुनो गौर से दुनियावालो..., गो गो गोविंदा, गोविंदा रे गोपाळा आदी गाण्यांचा समावेश आहे.
पुणेकर अडकले वाहतूककोंडीत
शहरातील मध्यवर्ती पेठांमध्ये लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्त्यांवर गोपाळा, गोविंदाचा गजर करत नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यातून मार्ग काढताना दुचाकीस्वारांना चांगलीच कसरत करावी लागली. पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालणेही कठीण झाले होते.