श्री क्षेत्र भुलेश्वर देवस्थान येथे दहीभात पूजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:15 AM2021-09-08T04:15:24+5:302021-09-08T04:15:24+5:30
श्री क्षेत्र भुलेश्वर देवस्थान भाविकांना दर्शनासाठी बंद असले, तरी श्रावण महिन्यात येथील पुजारी व मानकरी यांच्या वतीने शिवलिंगावरती विविध ...
श्री क्षेत्र भुलेश्वर देवस्थान भाविकांना दर्शनासाठी बंद असले, तरी श्रावण महिन्यात येथील पुजारी व मानकरी यांच्या वतीने शिवलिंगावरती विविध पूजा साकारण्यात आल्या. यात निलकंठेश्वर, मल्हार मार्तंड, फळांची, मिठाईची, कैलास पर्वत इत्यादी पूजा साकारण्यात आल्या. श्रावणी आमावस्या संपल्यानंतर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भुलेश्वराच्या शिवलिंगावरती दहीभात पूजा साकारण्यात आली.
दहीभाताची पूजा म्हणजे भात व दही एकत्र करून त्याचा शिवलिंगावर लेप दिला जातो व त्यातून श्री भुलेश्वर महाराजांची प्रतिमा साकारली जाते. पूजेनंतर हा भात सर्व उपस्थित भक्तांना प्रसाद म्हणून दिला जातो. उर्वरित भात वाहत्या पाण्यात विसर्जित केला जातो.
मंगळवारी पहाटे पाच वाजता गाभाऱ्यामध्ये असणाऱ्या शिवलिंगावर दहीभाताच्या माध्यमातून श्री भुलेश्वर यांची आकर्षक प्रतिमा तयार करण्यात आली. त्यानंतर शिवलिंगाला रुद्राभिषेक करून महाआरती करण्यात आली. यावेळी श्री क्षेत्र भुलेश्वर देवस्थानचे सर्व पुजारी व मानकरी उपस्थित होते.
फोटो : श्री क्षेत्र भुलेश्वर देवस्थान येथे दहीभात पूजा साकारण्यात आली.