दहीहंडीमुळे नागरिकांची झाली कोंडी; मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यावरही नागरिक त्रस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2023 07:34 PM2023-09-07T19:34:37+5:302023-09-07T19:38:40+5:30
दहीहंडी उत्सवानिमित्त पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आल्याने आज सकाळपासून मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यांवरही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. याचा त्रास वाहनचालकांबरोबर पादचाऱ्यांना सहन करावा लागला....
पुणे :दहीहंडी पाहण्यासाठी शहरासह उपनगरांतील नागरिक मंडई, दगडूशेठ मंदिर, बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, पेठा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. याच पार्श्वभूमीवर पुणे शहर पेठ परिसरात मोठी वाहतूक कोंडी होते. त्यामुळे दहीहंडी उत्सवानिमित्त पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आल्याने आज सकाळपासून मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यांवरही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. याचा त्रास वाहनचालकांबरोबर पादचाऱ्यांना सहन करावा लागला.
शहराच्या मध्य भागातील शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता परिसरातील वाहतूक संध्याकाळी ५ ते दहीहंडी संपेपर्यंत बंद राहील, असे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले होते; मात्र सकाळपासून काही ठिकाणी मंडळ तयारीला लागले होते. तर दुपारपासून रस्ते बंद करावे लागले. त्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीस सामोरे जावे लागले. दहीहंडीमुुळे नागरिकांची कोंडी झाल्याचे वाहनचालकांनी सांगितले.
बेलबाग चौक बंद :
- बुधवार चौकाकडून अप्पा बळवंत चौकाकडे होणारी वाहतूक एकेरी केल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या, तर अंतर्गत रस्त्यांवरील पर्यायी मार्गाच्या रस्त्यावर ही वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले. याशिवाय मजूर अड्डा चौक (बुधवार चौक) ते दत्तमंदिर चौक, बेलबाग चौक ते सेवासदन चौक, मजूर अड्डा चौक ते अप्पा बळवंत चौक, महात्मा फुले मंडई हे बंद आहेत.
- शहरातील दहीहंडीमुळे काही रस्ते बंद करावे लागल्याने वाहनचालकांनी या काळात पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे, तसेच दहीहंडी तरुण मंडळ परिसरात व रस्त्यावर वाहतूक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याने नागरिकांनी सहकार्य करावे.
- विजयकुमार मगर पोलिस उपायुक्त वाहतूक पुणे शहर
- जोड दंहीहंडी फोडल्यावर काय परिस्थिती पाहून देत आहे