पुण्यात दहिहंडी उत्सव दणक्यात! सिनेतारकांची उपस्थिती; स्पीकरचा दणदणाट, शहरभर फ्लेक्सबाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2022 03:03 PM2022-08-19T15:03:25+5:302022-08-19T15:08:33+5:30
आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेवूनच दहिहंडीच्या आडाने होणारे शक्ति प्रदर्शन यंदा दणक्यात
धनकवडी : भगवान श्रीकृष्णांने मथुरेला जाणारे दहीलोणी गोकुळच्या बालकांना मिळावे, या भूमिकेतून दहीहंडी रचली. मात्र आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेवूनच दहिहंडीच्या आडाने होणारे शक्ति प्रदर्शन यंदा दणक्यात होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
निवडणुका समोर असताना साजरे होणाऱ्या सर्व उत्सवांचा डामडौल औरच असतो. निवडणुकांशिवाय येणारे उत्सव साजरे करताना मात्र कार्यकर्त्यांना अग्नी दिव्यातून जावे लागते. शहरासह दक्षिण उपनगरात साजरी होणारी दहिहंडी म्हणजे निवडणुकांची सराव परिक्षा असते. कोरोनानंतर सण, आणि सार्वजनिक उत्सव धुम धडाक्यात आणि मोठ्या जल्लोषात साजरे होत असताना विनासायास मिळणारी रसद दहिहंडी मंडळांसाठी पर्वणी ठरत आहे. दहीहंडीच्या माध्यमातून आगामी महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने इच्छुकांकडून शक्तिप्रदर्शन करण्यात येणार असून शहरभर दहीहंडी साजरी करणाऱ्या मंडळांनी मोठ्या प्रमाणात फ्लेक्सबाजी केली आहे.
सिनेतारकांची उपस्थिती, दहीहंडी पथकांवर देण्यात येणारी बक्षिसे, विद्युत रोषणाईवर लाखो रुपयांचा खर्च केला जात आहे. कोरोना संसर्गामुळे गेले दोन वर्षे सार्वजनिक उत्सवांवर निर्बंध होते. राज्य शासनाने सार्वजनिक सणांवरील निर्बंध मागे घेतल्यानंतर यंदा दहीहंडी आणि गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांनी तयारी सुरू केली आहे. दहीहंडी आणि गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना भरीव सहाय करण्यासाठी इच्छुक आघाडीवर असून दहीहंडी उत्सवापूर्वी शहरभर फ्लेक्सबाजी करण्यात आली आहे.
दहीहंडीचा उत्सव शहरात गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येत होता. मात्र मागील काही वर्षांपूर्वी उपनगरात दहीहंडीचा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येत आहे. उच्च क्षमतेची ध्वनिवर्धक यंत्रणा, प्रकाश योजनेंवर लाखो रुपये खर्च करण्यात येत आहे. दहीहंडी उत्सवाला काही मंडळां कडून विधायक उपक्रमांची जोड देण्यात येत असून दहीहंडी उत्सवावर होणारा खर्च टाळून समाजोपयोगी उपक्रम राबविण्यावर भर दिला जात आहे. हि कौतुकास्पद बाब आहे.