दहीहंडीत ‘होऊ द्या खर्च’चा मंडळाचा पवित्रा

By admin | Published: August 24, 2016 01:05 AM2016-08-24T01:05:14+5:302016-08-24T01:05:14+5:30

पुढील वर्षी होणाऱ्या महापालिका निवडणुका याचा उत्तम योग जुळून आल्याने शक्तिप्रदर्शन करण्यासाठी मंडळांनी कंबर कसली

Dahihandit 'Let the Expenses' the Holy of the Board | दहीहंडीत ‘होऊ द्या खर्च’चा मंडळाचा पवित्रा

दहीहंडीत ‘होऊ द्या खर्च’चा मंडळाचा पवित्रा

Next


पुणे : राज्यात झालेला चांगला पाऊस आणि पुढील वर्षी होणाऱ्या महापालिका निवडणुका याचा उत्तम योग जुळून आल्याने शक्तिप्रदर्शन करण्यासाठी मंडळांनी कंबर कसली असून, यंदाच्या दहीहंडीसाठी ‘होऊ द्या खर्च’चा पवित्रा घेतला आहे. मंडळाच्या दहीहंडीला कोणता सेलिब्रिटी येणार, अशा स्वरूपाचे चौका-चौकांत मोठ मोठे फ्लेक्स लावून ‘हम में कितना है दम’ सांगण्याचीच जणू चढा-ओढ सुरू झाली आहे. यंदा ‘सैराट’च्या ‘झिंगाट’ची जादू दहीहंडीमध्ये अनुभवायला मिळणार असून, आर्ची दहीहंडीचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.
राज्यात चांगला पाऊस झाला असल्याने यंदा दुष्काळाचे संकट काहीसे टळले आहे, पाणीकपातीची समस्याही दूर झाली आहे. हा आनंद तर आहेच; पण पुढील वर्षी महापालिकेच्या निवडणुका होत आहेत, त्याचा फायदाही मंडळांकडून घेतला जाणार आहे. दहीहंडी आणि गणपती उत्सवामध्येच शक्तिप्रदर्शन करण्याची मोठी संधी असल्याने कार्यकर्त्यांनीही कसून तयारी केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मंडळांकडून उत्सव साजरे करण्याच्या प्रथेतच बदल झाला असून, दहीहंडी, गणेशोत्सव अशा उत्सवांना ‘इव्हेंट’चे स्वरूप दिले जाऊ लागले आहे. दहीहंडी फोडणाऱ्या पथकांना लाखोंची बक्षिसे देणे, गुलाल उधळून प्रदूषणात भर घालणे, कलाकारांना आमंत्रित करणे, उंचच उंच दहीहंड्यांसाठी स्पर्धा करणे असे प्रकार घडू लागले आहेत. यातच उत्सवांमध्ये गर्दी जमविण्यासाठी सेलिब्रिटींना आमंत्रित करण्याचेही फॅड निर्माण झाले आहे. चित्रपट किंवा कार्यक्रमांबरोबरच कलाकारांनाही उत्सवाच्या माध्यमातून पैसा कमविण्याची उत्तम संधी मिळत असल्याने तेही अशा उत्सवांना आवर्जून उपस्थिती दर्शवित आहेत. कलाकारांच्या लोकप्रियतेवर त्यांच्या मोबदल्याची रक्कम ठरते. कलाकारांच्या दहा-पंधरा मिनिटांच्या उपस्थितीसाठी आणि काही मिनिटांच्या गर्दीसाठी लाखो रुपयांची उधळपट्टी केली जाते. मराठी कलाकार दहीहंडी, गणेशोत्सवामधील उपस्थितीसाठी ५० हजारांपासून ५ लाख रुपयांपर्यंत मानधन घेतात, तर हिंदी कलाकारांच्या बिदागीच्या रकमा ५ लाखांपासून सुरू होतात. हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रियतेच्या शिखरावर असलेले कलाकारांचे बजेट ५० लाख रुपयांपर्यंत असते. दहीहंडी, गणेशोत्सवासारखे इव्हेंट हे कलाकारांच्या कमाईचे दिवस असतात.
आर्चीची सई ताम्हणकरवर मात!
गेल्या दोन-तीन वर्षांपासून दहीहंडीमध्ये अभिनेत्री सई ताम्हणकरला सर्वाधिक मागणी होती; मात्र ‘सैराट’मधील आर्ची रिंकू राजगुरूने सईवर मात केली आहे. सध्या सर्वाधिक मागणी आदी बिदागी रिंकूला मिळत आहे. ‘सैराट’ची संपूर्ण टीमच एका मंडळाने बोलावली असून, त्यांनी सात आकडी बिदागी घेतली आहे. सई ताम्हणकर येरवड्यातील दोन मंडळांच्या दहीहंडीसाठी येणार आहे. याशिवाय अमृता खानविलकर-मंडई मंडळ, नेहा गद्रे-हडपसर, नेहा पेंडसे- चंदननगर, शमिता शेट्टी-धानोरी, सोनल चव्हाण-भोसरी, प्राजक्ता माळी- वारजे येथे भेट देणार आहेत. शिवणे येथील एका मंडळाने जय मल्हारची संपूर्ण टीमच आमंत्रित केली आहे. ‘सैराट’चा परशा आकाश ठोसरही सध्या ‘भाव’खात आहे. वारजे आणि भोसरी येथील मंडळांना तो भेटी देणार आहे. संतोष जुवेकर धनकवडी येथे येणार आहे.

Web Title: Dahihandit 'Let the Expenses' the Holy of the Board

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.