Pune: रोज पाच हजारांची कमाई! कम्प्युटर इंजिनियरला ४४ लाखांचा गंडा
By भाग्यश्री गिलडा | Published: March 6, 2024 03:09 PM2024-03-06T15:09:51+5:302024-03-06T15:10:03+5:30
याप्रकरणी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात मंगळवारी (दि.५) गुन्हा दाखल करण्यात आला आहे....
पुणे : दिलेले टास्क पूर्ण केल्यास प्रति दिवशी दीड हजार ते पाच हजार रुपये मिळतील असे आमिष दाखवून कम्प्युटर इंजिनिअरची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात मंगळवारी (दि.५) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत कैलास भागवत बोरोले (वय - ४६, रा. बाणेर) यांनी पोलिसांना फिर्याद दिली आहे. त्यानुसार हा प्रकार १५ जानेवारी ते २० जानेवारी २०२४ या दरम्यान घडला आहे. अनोळखी क्रमांकावरून फोन येऊन टास्क पूर्ण केल्यास प्रति दिवशी दीड हजार ते पाच हजार रुपये मिळतील असे सांगितले. त्यानंतर हॉटेलला रेटिंग देण्याचे काम देऊन तक्रारदार यांना एका ग्रुपमध्ये ऍड करण्यात आले.
सुरुवातीला काही प्रमाणात मोबदला देऊन तक्रारदार यांना विश्वासात घेतले. त्यानंतर पैश्यांची गुंतवणूक केल्यास नफा अधिक मिळेल असे सांगून तक्रारदार यांना तब्बल ४३ लाख ९२ हजार रुपये भरण्यास भाग पाडले. पैसे भरूनही परतावा न मिळाल्याने चतुःशृंगी पोलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक युवराज नांद्रे करत आहेत.